Join us  

मुंबईत ५४१ प्रतिबंधित क्षेत्र,६ हजार इमारती सील; रुग्ण वाढीचा दर ०.४४ हून ०.३३ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2020 3:09 AM

रुग्णसंख्या वाढीचा साप्ताहिक दर जितका कमी तेवढे संसर्गावर नियंत्रण अधिक मानले जाते.

मुंबई : मुंबईत आतापर्यंत २ लाख ६२ हजार ४७६ रुग्ण कोरोनाबाधित असून, बरे झालेले रुग्ण २ लाख ३५ हजार ४१२ आहे. सक्रिय रुग्ण १५ हजार ९६२, तर १० हजार ३९३ मृत्यू झाले आहेत. तर मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९० टक्के असून, ५ नोव्हेंबरपर्यंत १५ लाख ९४ हजार ५९९ कोविडच्या चाचण्या झाल्या आहेत. परिणामी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येत असून, आता मुंबईत ५४१ सक्रिय कंटेन्मेंट झोन आहेत आणि ६ हजार ५४१ इमारती सीलबंद आहेत.

येथील रुग्णवाढीचा सरासरी दरही आता ०.३३ टक्क्यांपर्यंत खाली आला असून, रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असताना रुग्णसंख्या वाढीमध्येही लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढीचा साप्ताहिक दर जितका कमी तेवढे संसर्गावर नियंत्रण अधिक मानले जाते. २९ ऑक्टोबर रोजी असलेला ०.४४ टक्के इतका रुग्णवाढीचा सरासरी दर आता ०.३३ टक्के झाला आहे.

मुंबईने २१ ऑक्टोबर रोजी रुग्ण दुपटीचे शतक गाठले होते. २९ ऑक्टोबर रोजी १५७ दिवसांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर अवघ्या ८ दिवसांत म्हणजे ५ नोव्हेंबर रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ५१ दिवसांनी वाढून २०८ दिवस झाला. धारावी, वरळीत परिस्थिती सुधारत असताना मुलुंड, भांडुप, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर अधिकाधिक रुग्णांची नोंद होत होती. परिणामी शीघ्र कृती आराखडा राबविण्यात आला.

दरम्यान, ११ हजार ६० रुग्ण शुक्रवारी बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख ६२ हजार ३४२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.३५ टक्के एवढे झाले असून, सध्या राज्यातील मृत्युदर २.६३ टक्के आहे. 

दिवाळी आणि कोरोना

गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढली. परिणामी नवरात्रोत्सवात बऱ्यापैकी नियंत्रण राहिले. त्यामुळे कोरोना नियंत्रित राहिला. आता दिवाळी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करताना कोरोनाचे नियम पाळा. गरज नसताना घराबाहेर पडू नका. गर्दी करू नका. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.    

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई