Join us  

५३ रस्त्यांवर वाहतूकबंदी; ९९ रस्त्यांवर ‘नो पार्किंग’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 6:07 AM

बाप्पाच्या विसर्जनाला अवघे २४ तास शिल्लक असताना, पालिकेसह आता मुंबई वाहतूक पोलिसांनीही विसर्जनासाठी बंदोबस्तात वाढ केली आहे.

मुंबई : बाप्पाच्या विसर्जनाला अवघे २४ तास शिल्लक असताना, पालिकेसह आता मुंबई वाहतूक पोलिसांनीही विसर्जनासाठी बंदोबस्तात वाढ केली आहे. विसर्जन मिरवणुकीवेळी वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, शहरातील ५३ रस्त्यांवर वाहतूकबंदी केली असून, एकूण ९९ मार्गावर वाहन उभे करण्यास बंदी आहे. विसर्जन स्थळांजवळ तर सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास बंदी आहे.अनंत चतुर्दशीच्या दिवशी (रविवारी) दुपारी १२ ते दुसऱ्या दिवशी (सोमवार) सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूकबंदीचे नियम लागू आहेत. मिरवणूक सुरळीत पार पडण्यासाठी ५३ रस्त्यांवर वाहतूकबंदी करण्यात आली आहे, तर ५६ रस्त्यांवर एक दिशा वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. शहरातील प्रमुख १८ रस्त्यांवर मालवाहतूक करणाºया वाहनांवर बंदी असून, एकूण ९९ ठिकाणी दुचाकींसह सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास बंदी आहे.वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, गणेश घाट (पवई) या पाच महत्त्वाच्या ठिकाणी मुंबई शहर वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.विसर्जन मिरवणूक आणि शहरातील वाहतुकीच्या नियमनासाठी ३ हजार १६१ पोलीस अधिकारी आणि सुमारे १ हजार ५७० वाहतूक मदतनिसांचा फौजफाटा सज्ज करण्यात आला आहे. याचबरोबर, एन.एस.एस., स्काउट गाइड, वॉटर सेफ्टी पेट्रोल, नागरी संरक्षण दल अशा संस्थांचे कार्यकर्ते-विद्यार्थी वाहतुकीचे नियमन करतील.

टॅग्स :गणेशोत्सवगणेश चतुर्थी २०१८गणेश विसर्जन