ठाणे : एका लेडिज बारवर केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या डायरीच्या आधारे डायघर पोलीस ठाण्यातील ५१ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात वरिष्ठ निरीक्षक व निरीक्षकाचा समावेश आहे.डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘उत्सव’ या लेडिज बारवर १६ एप्रिलच्या मध्यरात्री विशेष शाखेने कारवाई करून मॅनेजर व काही बारबालांसह गिऱ्हाइकांनाही अटक केली होती. या बारचे अधिकृत नाव मात्र ‘साईकृपा’ आहे. या बारमध्ये हस्तगत केलेल्या काही डायऱ्यांमध्ये पोलिसांनाही ‘हप्ते’ दिल्याच्या नोंदी आढळल्या. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह ५१ कर्मचाऱ्यांची नावे होती. याची गंभीर दखल घेऊन विशेष शाखेने याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना दिली.त्यानंतर डायघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिदास पवार आणि निरीक्षक यू.जी. जाधव यांच्या नियंत्रण कक्षामध्ये तडकाफडकी बदल्यांचे आदेश आयुक्तांनी दिले. नोंदीतील तथ्य तपासून या अधिकाऱ्यांपाठोपाठ तब्बल ४९ कर्मचाऱ्यांवरही २५ मे रोजी बदल्यांची कारवाई करण्यात आली. या सर्वांना तातडीने पोलीस मुख्यालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले. अशी कारवाई करण्यात आल्याच्या वृत्ताला अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दुजोरा दिला. (प्रतिनिधी)मध्यरात्री कारवाई‘साईकृपा रेस्टॉरंट’च्या नावाने अधिकृत नोंदणी असलेल्या या बारमध्ये बिनधास्तपणे छमछम सुरू असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांना मिळाली होती. त्याच आधारे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांच्या पथकाने १६ आणि १७ एप्रिल २०१५ च्या मध्यरात्री कारवाई केली.
एकाच पोलीस ठाण्यातील ५१ पोलिसांच्या बदल्या
By admin | Updated: May 29, 2015 01:15 IST