Join us
Daily Top 2Weekly Top 5

५१ लाखांची जकात बुडविली

By admin | Updated: April 27, 2015 04:39 IST

बनावट कर पावत्यांंच्या आधारे तीन ठगांनी एका विदेशी कंपनीच्या मुंबईत आणल्या जाणाऱ्या किमती सामानाचा तब्बल ५१ लाखांचा जकात कर बुडविल्याची

मुंबई : बनावट कर पावत्यांंच्या आधारे तीन ठगांनी एका विदेशी कंपनीच्या मुंबईत आणल्या जाणाऱ्या किमती सामानाचा तब्बल ५१ लाखांचा जकात कर बुडविल्याची घटना मुलुंड येथे उघडकीस आली. विदेशी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन नवघर पोलिसांनी तीन ठगांविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.एका विदेशी कंपनीची भिवंडी आणि अंधेरीच्या मरोळ परिसरात दोन गोदामे आहेत. भिवंडी येथील गोदामात ठेवलेला माल मरोळमधील गोदामात नेण्याचे काम श्री साई एक्स्प्रेस कार्गो कंपनीचे मालक अजय पवार आणि विकास डोंगरे यांनी घेतले होते. कंपनीकडून पाठविण्यात येणाऱ्या मालाच्या जकात पावत्या सादर केल्या, तरी त्याची तपासणी होत नसल्याचे पवार आणि डोंगरे यांच्या लक्षात येताच बनावट जकात कर पावत्या बनवून कंपनीला फसविण्याचा प्लान त्यांनी आखला. या प्लॅननुसार साथीदार सतीश क्षीरसागरच्या मदतीने साईनाथ एक्स्प्रेस कार्गो नावाने कंपनी सुरु करुन जुनी कंपनी बंद करत असल्याचे या ठगांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार या कंपनीने मालाची वाहतूक करण्याचे काम या नव्या कंपनीला दिले. या आरोपींनी २५ आॅगस्ट २०११ ते १३ डिसेंबर २०१२ या कालावधीत कंपनीला बनावट जकात पावत्या सादर करुन तब्बल ५१ लाख रुपये कंपनीकडून उकळले.पालिकेच्या दक्षता पथकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन तपासणी केली असना हा घोटाळा उघड झाला. पालिकेने या प्रकरणी कंपनीला बुडविलेला जकात कर भरण्यासाठी नोटीस पाठविली आहे. फसवल्या गेलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत नवघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी डोंगरे, पवार आणि क्षीरसागर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांंचा शोध सुरु केला आहे. (प्रतिनिधी)