Join us  

'जेजे'ला अग्नि सुरक्षा प्रणालीसाठी ५१ कोटी रुपये

By संतोष आंधळे | Published: March 29, 2024 8:22 PM

या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाने दिलेला अग्नि सुरक्षा प्रणालीसाठी निधीचा वापर रुग्णालय परिसरातील सर्व विभागात करण्यात येणार आहे.

मुंबई: मुंबईतल्या जुन्या असणाऱ्या रुग्णालयापैकी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अख्त्यारीत येणाऱ्या जे जे रुग्णालय आहे. चाळीस पेक्षा अधिक परिसरात या रुग्णालयाचा परिसर असून या ठिकाणी अनेक ब्रिटिशकालीन इमारती आहेत. तसेच्या जुन्या पद्धतीची इलेक्ट्रिसिटीची यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र दरवर्षी या या ठिकाणी नियमित इलेक्ट्रिकल लोड ऑडिट करून घेत असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून अग्नी सुरक्षा प्रणाली ( फायर फायटिंग सिस्टीम ) सक्षम असणे गरजेचे आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने या ठिकाणची अग्नी सुरक्षा प्रणाली आणि अग्निप्रतिबंध योजना राबविण्याकरिता ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.    

काही दिवसापूर्वीच तापमानात होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात रुग्णालयांमधील आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने ऑक्सिजन टाक्या, ऑक्सिजन पाईप असलेल्या भागाची सुरक्षा, स्मोक डिटेक्टर आणि फायर अलार्मची स्थापना, नियमित इलेक्ट्रिकल लोड ऑडिट करून घेण्याचे निर्देश दिले आहेत.

जे जे रुग्णालयात अनेक जुन्या इमारती असून त्या ठिकणी राज्य अग्निसुरक्षा नियमांनुसार स्थानिक अग्निशमन विभागाकडून दरवर्षी अग्निसुरक्षा ना हरकत प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून घेत असतात.दरवर्षी  फायर ड्रिल आयोजित केल्या जातात. अग्निसुरक्षा योजना आणि उपकरणांची देखभाल आणि कर्मचारी प्रशिक्षणाच्या नोंदी ठेवण्याचे काम रुग्णालय प्रशासन करत असते.

या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाने दिलेला अग्नि सुरक्षा प्रणालीसाठी निधीचा वापर रुग्णालय परिसरातील सर्व विभागात करण्यात येणार आहे. कारण रुग्णालयात अग्नी सुरक्षा हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामध्ये कुठलीही तडजोड करून चालणार नाही. आपत कालीन स्थितीत आगी सारख्या घटना घडल्या तर कमर्चाऱ्यांसोबत विद्यार्थ्यांना सुद्धा कशा पद्धतीने वागले पाहिजे याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वसतिगृहे या परिसरात आहेत.

टॅग्स :जे. जे. रुग्णालयमुंबई