Join us  

५ हजार टन जलपर्णी पवई तलावातून निघाली; जैवविविधतेच्या संरक्षणासाठी मनपाची विशेष मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 9:49 AM

पवई तलावाच्या आजूबाजूच्या परिसराचे नैसर्गिक जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे

मुंबई : पवई तलावाच्या आजूबाजूच्या परिसराचे नैसर्गिक जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून ८ मार्च ते १६ एप्रिल दरम्यान ५ हजार ८९५ मेट्रिक टन जलपर्णी या तलावातून काढण्यात आली आहे. यामुळे २९ एकरचा परिसर जलपर्णीमुक्त झाला आहे. परिणामी नैसर्गिक समृद्धी वाढीस आणि जैवविविधतेचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. 

पवई तलावाचे नैसर्गिक संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक असल्याने सांडपाणी येण्यापासून अटकाव करून त्या वाहिन्या अन्यत्र वळविणे, पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी जैविक उपाययोजना करण्यात येत आहेत. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ही नुकतीच तलाव आणि परिसराला भेट देऊन या उपाययोजनांची पाहणी देखील केली होती आणि जलपर्णी हटवण्यासाठी सुरू केलेल्या कार्यवाहीला वेग देण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. त्यानुसार हार्वेस्टर मशीन, पंटून माउंटेड पोकलेन आणि पोकलेन, डंपर या यंत्र सामग्रीच्या सहाय्याने काढण्याची कामे पालिकेकडून सुरू आहेत.  

जलपर्णी काढण्यासाठी पालिकेकडून २ वर्षांचे कंत्राट दिले आहे. सध्या अस्तित्वात असलेली जलपर्णी काढण्याचा कालावधी ६ महिने इतका असून त्यानंतर त्याचा देखभालीचा कालावधी १८ महिने म्हणजे दीड वर्ष इतका आहे.

आणखी १९ हजार मेट्रिक टन जलपर्णी काढणार- १)  १८९१ मध्ये निर्माण केलेला पवई तलाव २२३ हेक्टर परिसर पाण्याने व्यापलेला आहे. 

२)  तलावाच्या ५५७.५० एकर पाण्याच्या क्षेत्रापैकी १२३.९७ एकर भागात जलपर्णी होती. त्यापैकी आतापर्यंत २९.२५ एकर क्षेत्रावरून जलपर्णी काढली आहे. यामुळे २३.५९ टक्के क्षेत्र जलपर्णी मुक्त झाले असून उर्वरित क्षेत्र ९४.७२ एकरावरील जलपर्णी काढण्याची कामे सुरू आहेत. 

३)  कंत्राटदाराने संपूर्ण परिसरातील २४ हजार ९८५ मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटवणे अपेक्षित असून आणखी १९ हजार ०९० मेट्रिक टन जलपर्णी कंत्राटदाराकडून काढली जाणे अपेक्षित आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिका