Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्यूआर कोडने पाच रुपये पाठवून ५० हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:06 IST

एमएचबी पोलिसांत गुन्हा दाखल; बोरिवलीतील अभियंत्याची बाेगस आर्मी अधिकारी बनून फसवणूकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्वतःचे घर भाडेतत्त्वावर ...

एमएचबी पोलिसांत गुन्हा दाखल; बोरिवलीतील अभियंत्याची बाेगस आर्मी अधिकारी बनून फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : स्वतःचे घर भाडेतत्त्वावर देणाऱ्याला बाेगस आर्मी अधिकाऱ्याने गंडा घातला. बोरिवलीतील एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. यात पाच रुपये पाठवून क्यूआर कोडच्या मदतीने ५० हजार रुपये उकळण्यात आले.

बोरिवलीत राहणारे एस. पाटील हे अभियंता असून त्यांनी घर भाड्याने देण्यासाठी वर्तमानपत्रांत जाहिरात दिली होती. स्वतःला सैन्यातील अधिकारी संबोधणाऱ्या रणदीपसिंह नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. त्याची पोस्टिंग सध्या मुंबईत झाली असून तो कुटुंबीयांसोबत पुण्याहून मुंबईला येणार असल्याने भाड्याने घर हवे असल्याचे त्याने पाटील यांना सांगितले. घरासाठीचे सिक्युरिटी डिपॉझिट आणि भाड्याची रक्कम आर्मी बँकेकडून पाठविली जाईल. त्यासाठी त्यांना संबंधित बँकेचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल, असेही त्याने सांगितले.

पाटील यांनी सिंह याला बँकेत एनईएफटी करायला सांगितले. मात्र आर्मी बँकेला त्याची परवानगी नाही, असे त्याने सांगितले. त्यानंतर पाटील यांचा विश्वास संपादन करण्यासाठी क्यूआर कोडमार्फत त्याने पाच रुपये पाठविले. त्यानंतर ५ मार्च, २०२१ ला पाटील यांच्या खात्यातील ५० हजार रुपये काढून घेतले. याविरोधात त्यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस चौकशी करीत आहेत.