Join us

मुख्यमंत्र्यांना ५० हजार पत्रे!

By admin | Updated: March 16, 2015 03:52 IST

जागतिक महिला दिनानिमित्त मनसेच्या महिला सेनेने ‘स्वच्छतागृह माझा अधिकार’ ही महिलांना स्वच्छतागृह मिळवून देण्याची चळवळ उभी केली आहे. स्वच्छतागृहां

मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त मनसेच्या महिला सेनेने ‘स्वच्छतागृह माझा अधिकार’ ही महिलांना स्वच्छतागृह मिळवून देण्याची चळवळ उभी केली आहे. स्वच्छतागृहांच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ५० हजार पत्रे पाठवण्याचा अनोखा उपक्रम मनसेने सुरू केला आहे. या वेळी मनसेच्या महिला उपाध्यक्षा शालिनी ठाकरे यांच्या प्रयत्नातून महिलांसाठी साकारलेल्या ६० स्वच्छतागृहांचा लोकार्पण सोहळा दिंडोशीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते पार पडला.मुंबईत सध्या ४ हजार ५०० सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. पैकी ६० ते ६५ टक्के स्वच्छतागृहे पुरुषांसाठी आहेत. रेल्वे स्थानक आणि इतर सार्वजनिक ठिकाणीदेखील महिला स्वच्छतागृहांची वानवाच आहे. त्यामुळे कामावर असणाऱ्या महिलावर्गाची मोठी कुचंबणा होते. परिणामी मोठ्या प्रमाणात महिलांना मूत्रपिंडाच्या आजाराला सामोरे जावे लागते. सर्वसामान्यांसाठी स्वच्छतागृह बांधणे हे शासनाचे कर्तव्य आहे. पण शासन ही जबाबदारी गंभीरपणे पार पाडत नाही. त्यामुळे सरकारला जाग यावी, यासाठी मनसेच्या महिला सेनेने हा उपक्रम हाती घेतला आहे. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानक, बस स्थानक, विमानतळ आदी विविध ठिकाणी हजर राहून महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी संबंधित पत्रावर स्वाक्षऱ्याही घेतल्या. अशाप्रकारे स्वाक्षरी असलेली ५० हजार पोस्टकार्ड्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आली. (प्रतिनिधी)