पालघर : आदिवासी मुलींच्या वसतीगृहाची झालेली दुरावस्था, निकृष्ट अन्नासह पुस्तकांची कमतरता आदी समस्यांच्या पूर्ततेसाठी तीन दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेल्या १७ मुलीपैकी पाच मुली अत्यवस्थ झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयातून खासगी रुग्णालायात दाखल करण्यात आले.तर रविवारी रात्री या पाच मुली व एका मुलाची तब्येत बिघडल्याने त्यांना पालघरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. पालघर बिडको औद्योगिक वसाहतीजवळच्या मुलींच्या वस्तीगृहातील १०६ तर मुलांच्या वस्तीगृहातील १७६ मुलांनी शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून उपोषणाला सुरूवात केली होती. यावेळी या मुलांनी उपोषण स्थगित करण्यासाठी विविध प्रशासकीय अधिकाऱ्याकडून प्रयत्न करण्यात येत होते. पंरतु तोंडी आश्वासनाच्या खैरातीला कंटाळलेल्या सर्व मुलांनी जोपर्यंत अप्पर आयुक्त सुधीर पाटील आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालघरमध्ये येऊन लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्धार केला होता. त्याप्रमाणे तीन दिवसापासून उपोषणाला बसलेल्या १७ मुलींपैकी पूजा बेलकर, दर्शनाराव, वनश्री वळवी, सोनाली कोरडा, शुभांगी वरगत या पाच मुलींची तब्येत अत्यवस्थ झाल्याने त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल केले गेले. या मुलींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, मनीषा निमकर, माजी खा. बळीराम जाधव, प्रशांत पाटील, प्रांताधिकारी शिवाजी दावभट, तहसीलदार चंद्रसेन पवार, आरपीआयचे सुरेश जाधव इ. नी भेट घेतली. यावेळी राजेंद्र गावितांनी इमारत डागडुजी, पाण्याची सोय, जेवणामध्ये सुधारणा इ. कामाना तात्काळ सुरूवात करण्याच्या सूचना केल्या. यावेळी हे उपोषण मागे घेण्यासंदर्भातल्या विनंतीला सर्वांनी नकार देत जो पर्यंत अप्पर आयुक्त आमची भेट घेऊन लेखी स्वरूपात मागण्या मान्य करीत नाहीत तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
उपोषणकर्त्या ५ विद्यार्थीनी गंभीर
By admin | Updated: December 22, 2014 23:16 IST