मुंबई : प्रवाशांची तिकीट खिडक्यांसमोरील रांगा कमी करण्यासाठी रेल्वेने काही महिन्यांपूर्वी पेपरलेस मोबाइल तिकीट सेवा सुरू केली. मात्र, या सेवेला प्रवाशांचा अद्याप फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने, एटीव्हीएमप्रमाणे या प्रणालीतही प्रवाशांना पाच टक्के सवलत द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. या प्रणालीला पाहिजे तसा प्रतिसाद अद्यापही मिळालेला नाही. डिसेंबर २0१४ पासून सेवा सुरू झाल्यानंतरही आतापर्यंत दर दिवशी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरून जवळपास दीड हजारांपर्यंत तिकीटविक्री होते. मोबाइल तिकीट सेवेला प्राधान्य मिळावे, यासाठी रेल्वेच्या ‘क्रिस’ संस्थेबरोबरच पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेकडूनही प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसारच पश्चिम रेल्वेने पाच टक्के सवलतीचा प्रस्ताव पाठविला आहे. त्याचबरोबर, मोबाइल तिकीट काढताना डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर 0.७५ टक्के कर आकारला जातो, तर आॅनलाइन भरणा करताना १० रुपये शुल्क आकारले जाते. हे शुल्क कमी करण्याचीही विनंती करण्यात आली आहे. त्याचबरोबर, या प्रस्तावात दोन किलोमीटर एवढी असलेली जीपीएस प्रणालीची हद्द वाढवून दहा किलोमीटरपर्यंत करावी. त्यामुळे प्रवाशांना स्थानकापासून लांब असतानाही तिकीट काढता येणे शक्य होईल, असेही नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
मोबाइल तिकीट सेवेत ५ टक्के सवलत द्या!
By admin | Updated: October 28, 2016 04:03 IST