Join us

पाच मेगाप्रकल्प लवकरच ट्रॅकवर

By admin | Updated: December 28, 2014 01:41 IST

मुंबईच्या उपनगरीय मार्गावर गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असणाऱ्या चार महत्त्वपूर्ण प्रकल्पांना ट्रॅकवर आणण्याचा विचार रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे.

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय मार्गावर गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असणाऱ्या चार महत्त्वपूर्ण प्रकल्पांना ट्रॅकवर आणण्याचा विचार रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. हार्बरवर १२ डब्यांचा विस्तार आणि बेलार्ड पियर ते डॉकयार्ड रोड असा विस्तार तसेच सीएसटी ते पनवेल आणि चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड कॉरीडोर बरोबरच मेन लाइनवरील सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारशी बोलणी करणार असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात मोबाइल तिकीट सेवेचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी त्यांनी या प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या वेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक मुकेश निगम, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक हेमंत कुमार, मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम, खासदार अनिल देसाई, राहुल शेवाळे, मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई आणि अन्य रेल्वे अधिकारी उपस्थित होते.मुंबईत मोठ्या प्रमाणात लोकलमधून प्रवासी प्रवास करतात आणि त्यांची संख्या वाढत आहे. जिकडे प्रत्येक क्षण आणि मिनिट महत्त्वाचा आहे, अशा ठिकाणी सुविधा देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यासाठी मुंबईतील प्रकल्पांकडे खास लक्ष असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले. हार्बरचा बॅलार्ड पियरपर्यंत विस्तार करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला असून, तसा प्रस्तावच तयार केला आहे. त्यासाठी जागा लागणार असून, त्यात मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा लागणार आहे. यासाठी त्यांच्याशी बोलणीही सुरू आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री (रस्ते वाहतूक आणि महामार्ग) नितीन गडकरी यांच्यासोबत एक बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे हार्बरवर १२ डब्यांसाठी प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण सुरू असून, ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यासाठी आढावाही घेण्यात येत आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे सध्या एलिव्हेटेड ही मुंबईची गरज असून, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड प्रकल्पासाठी राज्य सरकारकडे बोलणी करू आणि येत असलेल्या अडचणी काय आहेत त्यावर चर्चा करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असे प्रभू यांनी सांगितले. त्याचप्रमाणे एमयूटीपी-२मधील सीएसटी ते कुर्ला प्रकल्पासाठीही ८९0 कोटींचा निधी मंजूर झाला असून, तो कसा पूर्ण करता येईल याचा विचारही केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. डॉकयार्ड रोड ते बॅलार्ड पियर असा हार्बरचा विस्तार करण्याचा प्रकल्प रेल्वेकडून तयार करण्यात आला आहे. हा विस्तार झाल्यास सीएसटीवरील ओझे कमी होण्याबरोबरच नवीन मार्गही मिळतील, असे रेल्वेतील एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. बम्बार्डियर लोकल मुंबईत दाखल झाल्या असल्या तरी त्या अजूनही सेवेत आलेल्या नाहीत. यासंदर्भात मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे बोलणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले. सीएसटी ते पनवेल एलिव्हेटेड कॉरीडोर प्रकल्प हा खासगी भागीदारीतून पूर्ण केला जाणार आहे. तत्पूर्वी रेल्वे बोर्डाकडूनही मंजुरी मिळाली आहे. मात्र राज्य सरकारची जमीनही लागणार असल्याने त्यासाठी रेल्वेमंत्र्यांकडून बोलणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)च्मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी या वेळी आपल्या भाषणातून रेल्वेविषयीचे प्रश्न मांडताना प्रभूंच्या हाती मुंबई असल्याचे सांगितले. लोकल गाडीत शिरायला जागा मिळत नाही आणि बसायलाही जागा नसतेच. च्हा प्रश्न सोडवण्यात यावा. तसेच स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याबरोबरच स्वयंचलित दरवाजांचा प्रश्न हा लोकलच्या गर्दीवर किती उपयुक्त आहे ते बघूनच तो नीट सोडवण्यात यावा, अशी मागणी केली. च्हे सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत असे सांगतानाच आम्हाला वर असणाऱ्या प्रभूंच्या घरी लवकरच जाण्याची इच्छा नाही. त्यामुळे सध्या असलेल्या प्रभूने हे प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा, अशी मागणी केली. दादर ते मुंबई सेंट्रल लोकल प्रवास : दादर येथे मध्य रेल्वेचा मोबाइल तिकीट सेवेचा कार्यक्रम आटोपून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबई सेंट्रल येथील कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी प्रवास केला. दादर स्थानकात जलद लोकल पकडून सेकंड क्लासच्या डब्यातून प्रवास करीत प्रभू यांनी मुंबई सेंट्रल स्थानक गाठले.