Join us

४९० पालिका कर्मचार्‍यांना पदोन्नती

By admin | Updated: May 29, 2014 01:17 IST

पालिकेत १२ ते २४ वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण करणार्‍या सुमारे ४९० कर्मचार्‍यांना कालबद्ध पदोन्नती मिळणार असून त्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे

राजू काळे , भार्इंदर - पालिकेत १२ ते २४ वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण करणार्‍या सुमारे ४९० कर्मचार्‍यांना कालबद्ध पदोन्नती मिळणार असून त्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या काळापासून सध्याच्या महापालिकेत काम करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या सुमारे ४९० इतकी आहे. यात २२ लिपिक, ४४० सफाई कर्मचारी, १० वाहनचालक व १० शिपायांचा समावेश आहे. उर्वरित कर्मचारी निवृत्त झाले आहेत. यातील ३० कर्मचार्‍यांची सेवा ३० वर्षांहून अधिक, तर काहींची सेवा १२ ते २४ वर्षांदरम्यान झाली आहे. शासकीय नियमानुसार १२ वर्षांहून जास्त काळ नियमित सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांना कालबद्ध पदोन्नती देऊन वरिष्ठ वेतनश्रेणी देणे बंधनकारक आहे. तरीही १२ वर्षांहून अधिक वर्षे सेवा देणारे कर्मचारी राजकीय व प्रशासकीय उदासीनतेमुळे त्यापासून वंचित राहिले होते. ही पदोन्नती मिळावी, यासाठी म्युनिसिपल लेबर युनियनच्या माध्यमातून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. परंतु, प्रशासनाने आर्थिक कारण पुढे करीत या पदोन्नतीला सतत टाळण्याचा प्रयत्न चालविला होता. यावर कर्मचारी संघटना आक्रमक झाल्यानंतर प्रशासनाने कालबद्ध पदोन्नतीच्या तपासणीसाठी आर. आर कन्सल्टन्सी या खाजगी सल्लागाराची वर्षभरापूर्वी नियुक्ती करुन पदोन्नतीचा प्रश्न निकाली काढण्याचे ठरविले. कालबद्ध पदोन्नतीचे कामकाज नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे.