Join us  

Corona Vaccination: बीकेसीसह मुंबईतील ४९ लसीकरण केंद्रे झाली बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 6:39 AM

Corona Vaccine shortage: साठा संपला; रांगेत उभ्या असलेल्या अनेकांना लस न घेताच फिरावे लागले माघारी 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील वांद्रे-कुर्ला (बीकेसी) येथील सर्वात मोठ्या काेरोना लसीकरण केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ मंगळवारी लस संपल्याचे फलक झळकले. लसींचे डोस संपल्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच घरी परतावे लागले. मुंबईत दुसऱ्यांदा लसीकरण केंद्र बंद पडली आहेत, मंगळवारी पालिकेची आणि खासगी मिळून एकूण ४९ लसीकरण केंद्र ठप्प झाल्याची माहिती पालिकेने दिली.

मुंबईत लस टंचाईचा सलग तिसरा दिवस असून १ मे पासून सुरू होणाऱ्या नव्या टप्प्यातील लसीकरण कसे करणार, असे आव्हान यंत्रणांसमोर आहे.बीकेसी केंद्रावर मंगळवार सकाळपासून कोविशिल्डचे ३५० ते ४०० डोस नोंदणी करुन येणाऱ्या नागरिकांना देण्यात आले. मात्र त्यानंतर येथे लसींचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे आता पहिला डोस घेणाऱ्यांना वाट पहावी लागेल, असे वांद्रे कुर्ला जम्बो कोविड केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र डेरे यांनी सांगितले. दुसरा डोस देण्यासाठी कोव्हॅक्सिनचे दोन हजार डोस उपलब्ध असून ते दिवसभरात दिले गेल्याची माहितीही त्यांनी दिली.मुंबईत गेल्या आठवड्यापर्यंत ४० ते ५० हजार लोकांचे लसीकरण एका दिवसात होत होते. मात्र सोमवारी ३५,३०९ लोकांचेच लसीकरण होऊ शकले, तर मंगळवारी २६ हजार ५४५ लोकांचे लसीकरण करण्यात आले. खासगी केंद्रांवर जेमतेम सोमवारी ५८५८ लोकांचे लसीकरण होऊ शकले, तर मंगळवारी अवघ्या ७४९३ लोकांचे लसीकरण करण्यात आले.

लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविणारसध्या मुंबईत पालिकेची ४० व खासगी ७० तसेच राज्य व केंद्र सरकारची रुग्णालये, अशी एकूण १२० केंद्रे आहेत. पालिकेची ४० केंद्र वाढवून १०० पर्यंत ही संख्या वाढवली जाणार आहे. खासगी आस्थापना ज्यात जास्त संख्येने कामगार आहेत, अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु केले जाणार आहे. ...तर आज पुन्हा लसीकरण मुंबईत दररोज ३० ते ५० हजार लसीकरण केले जात आहे. यामुळे लसीचा साठा कमी पडत आहे. लसींचा पुरवठा कमी असल्याने ४९ लसीकरण केंद्र बंद पडल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत लसींचा नवा साठा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ताे उपलब्ध झाल्यास बुधवारी सकाळी पुन्हा लसीकरण केंद्रे टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यात येतील, असेही काकाणी यांनी नमूद केले. दरम्यान, लसींचा साठा पुरेसा नसल्यामुळे बुधवारी मुंबईतील १२८ पैकी ७५ लसीकरण केंद्रेच सुरू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.  

टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्या