Join us

बेलापूरमध्ये ४९ टक्के मतदान

By admin | Updated: October 16, 2014 00:45 IST

नवी मुंबईतील प्रतिष्ठेची लढाई असलेल्या बेलापूर मतदार संघामध्ये ४९ टक्के मतदान झाले आहे. दिवसभर शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली असून एकही गुन्हा दाखल झालेला नाही.

नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रतिष्ठेची लढाई असलेल्या बेलापूर मतदार संघामध्ये ४९ टक्के मतदान झाले आहे. दिवसभर शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली असून एकही गुन्हा दाखल झालेला नाही. शासनाने सुट्टी जाहीर केल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह अनेक व्यापारी पेठांमध्ये शुकशुकाट होता.ठाणे जिल्ह्णातील सर्वात प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये बेलापूरचा समावेश आहे. माजी पालकमंत्री गणेश नाईक या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. शहरातील ३७५ मतदान केंद्रांमध्ये सकाळपासून रांगा लागल्या होत्या. पहिल्यांदाच पंचरंगी लढत असल्यामुळे मतदान केंद्राच्या परिसरामध्ये सर्वपक्षांचे बुथ दाटीवाटीने उभारण्यात आले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत जवळपास २० टक्के मतदान झाले होते. दुपारी उन्हाचा पारा वाढल्यामुळे मतदान केंद्रांमधील गर्दी कमी झाली होती. सायंकाळी पुन्हा मतदारांची गर्दी झाल्याचे चित्र दिसत होते. मतदार संघामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली २०० कर्मचाऱ्यांची विशेष तुकडी करण्यात आली होती. पोलिसांच्या दक्षतेमुळे मतदान पूर्णपणे शांततेमध्ये पार पडले. मतदानासाठी सुट्टी जाहीर केल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठप्प होते. पाचही मार्केट बंद ठेवण्यात आली होती. शहरातील अनेक मोठ्या कंपन्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या.