मुंबई : रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) हेल्पलाइनला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिला डब्यात घुसखोरी, हरविलेले सामान, संशयास्पद सामान व व्यक्ती याची माहिती, तसेच तक्रार करण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात दीड हजारपेक्षा जास्त कॉल हेल्पलाइनवर आल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे, या हेल्पलाइनद्वारे जखमी प्रवाशांना मदतही पोलिसांकडून करण्यात आली आहे.रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांच्या मदतीसाठी ९८३३३३११११ हा हेल्पलाईन नंबर सुरूकरण्यात आला आहे. या हेल्पलाइनवर आॅक्टोबर महिन्यात १ हजार ५१४ तक्रारी दाखल झाल्या असून, गहाळ झालेल्या बॅगांविषयी १0२९ कॉल आल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये २0८ बॅगा परत मिळाल्याची नोंदही करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, संशयास्पद सामान आढळल्याच्या ७६ तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, संशयास्पद व्यक्तींची माहिती देण्यासाठी आठ वेळा कॉल आला आहे. रेल्वे अपघातातील जखमींनाही हेल्पलाइनद्वारे पोलिसांनी मदत मिळवून दिली आहे. ४९ जखमींना तातडीने मदत करतानाच, २७ लोकांना वैद्यकीय मदतही पुरविली आहे. महिला डब्यात बऱ्याच वेळेला पुरुषांकडूनही प्रवास केला जातो. यामध्ये फेरीवाल्यांची संख्याही अधिक असते. अशा घुसखोरांविरोधात महिला प्रवाशांकडून तक्रार येताच, कारवाई हेल्पलाइनद्वारे करण्यात आली. अशा ११९ तक्रारी आॅक्टोबर महिन्यात आल्या होत्या.
४९ जखमींना तातडीची मदत
By admin | Updated: November 16, 2015 02:58 IST