Join us

कंपनीला ४५ कोटींचा गंडा

By admin | Updated: November 19, 2015 04:01 IST

गुंतवणुकीची रक्कम अल्पावधीत दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून एल्फिन्स्टन येथील नामांकित कंपनीला ४५ कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी सिएस्टा लॉजिस्टिक लिमिटेड कंपनीच्या

मुंबई : गुंतवणुकीची रक्कम अल्पावधीत दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून एल्फिन्स्टन येथील नामांकित कंपनीला ४५ कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी सिएस्टा लॉजिस्टिक लिमिटेड कंपनीच्या मालकाविरुद्ध एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे मालक अशोक छटराजा आणि त्यांची पत्नी रजनी हे या गुन्ह्यात आरोपी असून, याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.एल्फिन्स्टन येथील इंडिया बुल्स इमारतीत ए. ए. डेव्हलपमेंट कॅपिटल इंडिया कंपनी लिमिटेडचे कार्यालय आहे. सप्टेंबर २०१० मध्ये छटराजा यांची या कंपनीच्या मालकासोबत ओळख झाली. ओळखीदरम्यान सिएस्टा कंपनीमध्ये पैसे गुंतवल्यास त्याचा दुप्पट मोबदला मिळवून देण्याचे आमिष छटराजा यांनी दाखवले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडत ए. ए. डेव्हलपमेंट कंपनीकडून आॅगस्ट २०१४ पर्यंत तब्बल ४५ कोटींची गुंतवणूक करण्यात आली होती. मात्र पैसे गुंतवूणही पैसे परत मिळत नसल्याने यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनीचे सल्लागार राघवा कपूर यांनी एन. एम. जोशी पोलीस ठाणे गाठून मंगळवारी तक्रार दिली.त्यांच्या तक्रारीवरून सिएस्टा कंपनीचे मालक अशोक छटराजा आणि त्यांची पत्नी रजनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली. या कंपनीने यापूर्वी अशाप्रकारे गंडा घातला आहे का, याबाबत आर्थिक गुन्हेविरोधी शाखेचे अधिकारी तपास करीत आहेत. असा प्रकार घडला असल्यास गुंतवणूकदारांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन आर्थिक गुन्हेविरोधी विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)