Join us

लॉकडाऊन काळात ४४ टक्के अकुशल कामगार बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मार्च २०२० पासून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नोकरदार मुंबईकरांना वेतन कपात, बिनपगारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मार्च २०२० पासून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नोकरदार मुंबईकरांना वेतन कपात, बिनपगारी सुटी, कामाचे वाढीव तास, अशा त्रासांचा सामना करावा लागला, तर ४४ टक्के अकुशल कामगारांच्या हातचे काम गेले. ६९ टक्के लोकांना घरभाडे भरणेही अवघड झाले, असे वास्तव सर्वेक्षणातून समोर आले आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील उपजीविका, आरोग्य, शिक्षण, घरे आणि परिवहन झालेल्या परिणामांचा आढावा घेणारा अहवाल प्रजा फाउंडेशन या संस्थेने नुकताच प्रकाशित केली. या अहवालानुसार ६६ टक्के लोकांपैकी ३६ टक्के बिनापगारी सुटी, २८ टक्के लोकांची पगारकपात, २५ टक्के बिनपगारी आणि १३ टक्के लोकांनी जादा तास काम केले, तर ४४ अकुशल कामगार, २४ टक्के स्वयंरोजगार, १९ टक्के लिपिक व वरिष्ठ अधिकारी, १३ टक्के कार्यकारी स्तरावरील अधिकारी, १४ टक्के कुशल कामगार बेरोजगार झाले.

या काळात व्यवसायात मंदी आल्याचे ६२ टक्के व्यापाऱ्यांनी सांगितले. १३ टक्के व्यवसाय पूर्णपणे, नऊ टक्के तात्पुरते बंद झाले. लॉकडाऊन काळात नोकरी गेल्याने २३ टक्के मुंबईकर स्थलांतरित झाले. ५७ टक्के रहिवासी बेरोजगार झाल्याने मुंबई सोडून गेले होते. यामध्ये ८० टक्के आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नोकरदार वर्गाचा समावेश होता.

आर्थिक स्तर खालावला

सामाजिक- आर्थिक स्तरामध्ये वरच्या वर्गाच्या उत्पन्नात २२ टक्क्यांनी, तर दुर्बल वर्गाच्या उत्पन्नात ४५ टक्क्यांनी घट झाली आहे. या काळात घरभाडे भरणेही मुश्कील झाल्याचे ६९ टक्के नागरिकांनी सांगितले.

चिंता वाढली

या काळात चिंता व ताणाचे प्रमाण ६० टक्क्यांनी वाढले. यापैकी ८४ टक्के लोक आपल्या मानसिक आरोग्याविषयी कोणाशीही बोललेही नाहीत, असे समोर आले.

विद्यार्थ्यांवर परिणाम

ऑनलाइन शिक्षणामुळे शारीरिक हालचाली नसल्याने मुलांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे ६३ टक्के पालकांनी सांगितले. ४३ टक्के मुलांना डोळ्याच्या समस्या, चिडचिडेपणा (६५ टक्के) मित्र-मैत्रिणींना भेटता येत नसल्याने ७४ टक्क्यांमध्ये नैराश्य असल्याचे आढळून आले.