सुरेश लोखंडे ल्ल ठाणेशैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आदिवासी, दुर्गम भागातील मुला-मुलींसाठी इंग्रजी माध्यमाच्या ४३ मॉडेल स्कूल व गर्ल्स होस्टेल राज्यातील दहा जिल्ह्यात मंजूर केल्या होत्या. पण केंद्रातील भाजपा सरकारने या शाळा रद्द करून केवळ गर्ल होस्टेल बांधण्यास परवानगी दिली आहे. रद्द केलेल्या या शाळांमध्ये पालघर जिल्ह्यातील पाच शाळांचाही समावेश आहे.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाव्दारे आदिवासी, दुर्गम भागातील आदिवासी मुला-मुलींसाठी या इंग्रजी माध्यमाच्या या ‘मॉडेल स्कूल’ बांधण्यात येणार होत्या. राज्यभरात सुमारे २१५ कोटी रूपये खर्चून या ४३ स्कूल आणि गर्ल्स हॉस्टेलचे बांधकाम होणार होते. सुमारे पाच एकरच्या भूखंडावर उभ्या राहणाऱ्या होस्टेलसाठी सुमारे पाच कोटी खर्च निश्चित करण्यात आला होता. यामध्ये शाळेची दोन मजली इमारत व गर्ल होस्टेलच्या बांधकामाचा समावेश होता. पण आता या शाळांची मान्यताच काढून घेण्यात आली आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यात सुमारे २५ कोटी रूपये खर्चाच्या या पाच शाळांचे बांधकामेही थांबवण्यात आल्याचे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता थोरात यांनी लोकमतला सांगितले.या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार होते. यानुसार सध्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्याच्या पाच शाळा पालघर जिल्ह्यात सुरू आहेत. यातील सर्व विद्यार्थ्याना जवळच्या खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये किंवा सेमि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करून त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना केवळ दहावी पर्यंत शिकवण्यात येणार आहे. जव्हार तालुक्यातील विनवळ, डहाणू तालुक्यातील बाडा-पोखरण, विक्रमगड तालुक्यातील मलवाडा व वाकी, तलासरी तालुक्यातील पाटील पाडा आणि मोखाडा तालुक्यातील पुलाची वाडी येथे या मॉडेल स्कूल उभ्या राहणार होत्या. त्यासाठी भूखंडही संपादीत करण्यात आलेले आहे. या गर्ल्स हॉस्टेल सुरू होणार असली तरी मॉडेल स्कूल मात्र सुरू होणार नाहीत.केंद्र शासनाच्या या सूचनेनुसार पालघर जिल्ह्णातील तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि डहाणू या पाच तालुक्यातील या ‘ मॉडेल स्कूल’ रद्द करण्यात आल्या आहेत. बांधकामे सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी ही पूर्ण करण्यात आली होती. या स्कूल ऐवजी आता केवळ गर्ल होस्टेलच्या इमारतीचे बांधकाम होणार आहे. त्यासाठी तीन कोटी दोन लाखांच्या खर्चाची मर्यादा देण्यात आल्याचे अभियंता थोरात यांनी सांगितले.
४३ ‘मॉडेल स्कूल’ रद्द!
By admin | Updated: May 17, 2015 01:32 IST