मुंबई ; रेल्वे पोलीस (आरपीएफ) दलालविरोधी पथकाने विरार येथे दलालांविरोधात केलेल्या विशेष कारवाईत मोठ्या तिकिटांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. यात ४२ लाखांची ९११ रेल्वे तिकिटे जप्त केली असून, दोन दलालांनाही अटक करण्यात आली आहे. गर्दीच्या हंगामात रेल्वेची तिकिटे मिळवताना प्रवाशांच्या नाकीनऊ येतात. यात दलालांचा अधिक हस्तक्षेप होत असल्याने तिकिटे मिळत नसल्याचा आरोप वेळोवेळी करण्यात आला आहे. त्यानुसार पश्चिम आणि मध्य रेल्वे पोलिसांकडून रेल्वेच्या विशेष दलालविरोधी पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, विरार येथे एका ठिकाणी छापा टाकण्यात आला असता कल्पेश शाह आणि संदीप पारेख या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांनीही मेल-एक्स्प्रेस गाड्यांची तिकिटे काढण्यासाठी १,४00 पेक्षा अधिक खासगी आयडी आणि ६00 इंटरनेट प्रोटोकॉल्स उघडले होते. त्यामुळे बनावट आयपी माहितीच्या आधारे एकाच वेळी २५ ते १३६ तिकिटे काढत असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यांच्याकडून १० संगणक आणि ८ पेन ड्राइव्हही घेण्यात आले. (प्रतिनिधी)
दलालांकडून ४२ लाखांची रेल्वे तिकिटे जप्त
By admin | Updated: September 27, 2014 06:25 IST