मुंबई: मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचे अवयवदान करता येऊ शकते, या विषयी गेल्या दोन वर्षांत जनजागृती वाढली आहे. २०१३ च्या तुलनेत २०१४ आणि २०१५ साली दुप्पट म्हणजेच, अनुक्रमे ४१ आणि ४० कॅडेव्हर डोनेशन झाली आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या दोन कॅडेव्हर डोनेशमुळे पाच जणांना जीवनदान मिळाले आहे. पी.डी.हिंदुजा रुग्णालयातील एका ६६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी दोन मूत्रपिंडे दान करण्यास संमती दिली. त्यामुळे दोघांना जीवनदान मिळाले आहे. एक मूत्रपिंड हिंदुजा रुग्णालयातील एका रुग्णाला दिले असून, दुसरे मूत्रपिंड आयएनएस अश्विनी रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आले आहे. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयातील एका ६९ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. या पुरुषाचा अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार बसला. यानंतर रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. या पुरुषाच्या नातेवाईकाने यकृत, दोन मूत्रपिंडे, त्वचा आणि डोळे दान करण्यास संमती दिली. एक मूत्रपिंड ज्युपिटर रुग्णालयात तर दुसरे मूत्रपिंड जसलोक रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आले. यकृत ज्युपिटर रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आले.एखाद्या व्यक्तीचा मेंदू मृत झाल्यावरही त्याच्या इतर अवयवांचे कार्य सुरू असते. त्या अवयवांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नसेल, तर अशा व्यक्तींचे अवयवदान करता येते. या विषयी गेल्या दोन वर्षांमध्ये जनजागृती झाल्यामुळे अनेक गरजूंना जीवनदान मिळत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
४० जणांनी केले अवयवदान
By admin | Updated: November 17, 2015 02:41 IST