मुंबई : माटुंगा पोलिसांनी अटक केलेल्या गुजरातच्या गुंगीमॅन विरोधात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, दिल्ली, गुजरातसह विविध भागात तब्बल ४० गुन्हे दाखल आहेत. हाजी हासम समा उर्फ सलीम उर्फ रमजान (३७) असे नाव असलेल्या ‘गुंगीमॅन’ने गुंगीचे औषध देऊन सामान्य नागरिकांसह पोलिसांनाही अनेकदा चकवा दिला होता. खून,जबरी चोरी, दरोडा, वाहन चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये त्याचा समावेश आहे.माटुंगा परिसरात मोटार वाहन चोरी करत असल्याच्या संशयातून माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब काकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्याला जेरबंद केले. मूळचा कच्छ येथील रहिवाशी असलेला रमजान मेस्त्रीचे काम करत होता. २०१३-२०१४ मध्ये तो सराईत गुन्हेगार ओमप्रकाश विष्णोईच्या संपर्कात आला. त्याच्या मदतीने छोट्या मोठ्या चोरी तो करत होता. व्यवहारावरुन दोघांमध्ये वाद झाल्यामुळे ते वेगळे झाले. झोपेच्या गोळ्या देऊन नागरिकांची फसवणूक करता येण्याविषयीची बातमी त्याने वाचली आणि तो हीच पद्धत अवलंबून चोऱ्या करू लागला. त्यानंतर त्याने टूर्स ट्रॅव्हल्सकडे मोर्चा वळविला. प्रवासाठी तो गाड्या ठरवायचा. चालकालाच गुंगीचे औषध देऊन तो गाडीसोबत पसार व्हायचा. मुंबईतील रिक्षाचालकांनाही त्याने लुटले होते. गुंगीच्या औषधाचे प्रमाण जास्त झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याने रमजानवर हत्येचे गुन्हेही नोंदवले गेले. २०१४ ते सप्टेंबर २०१५ पर्यंत त्याच्याविरुद्ध गुजरातसह महाराष्ट्रात ४० गुन्हे दाखल आहेत.शीतपेयातून नशेची गोळी२६ मार्च २०१५ रोजी हत्येच्या गुन्ह्यात गुजरातेतील वलसाड पोलिसांनी त्याला अटक केली होती. सुनावणीसाठी रमजानला न्यायालयात नेत असताना, रमजानची पत्नी मरियम आणि भाऊ अन्वीर यांच्या मदतीने पोलिसांनाच शीतपेयातून नशेची गोळी देऊन रमजानने पळ काढला होता.
‘गुंगीमॅन’विरुद्ध ४० गुन्ह्यांची नोंद
By admin | Updated: November 3, 2015 03:10 IST