Join us

रस्ते दुरुस्तीसाठी ४ कोटींची तरतूद

By admin | Updated: June 4, 2015 22:33 IST

ठाणे महापालिकेने यंदा रस्ता दुरुस्तीसाठी ४ कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय, प्रत्येक प्रभाग समितीसाठीही याच कामासाठी २५ लाखांची आर्थिक तरतूद केली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेने यंदा रस्ता दुरुस्तीसाठी ४ कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय, प्रत्येक प्रभाग समितीसाठीही याच कामासाठी २५ लाखांची आर्थिक तरतूद केली आहे. सध्या महापालिकेने युद्धपातळीवर खड्डे बुजविण्यास सुरुवात केली असून आयुक्त संजीव जयस्वाल रोजचा अहवाल व्हॉट्सअ‍ॅपवर मागवित आहेत. त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी त्या तत्परतेने काम करीत आहेत. शहरातील खड्डे ३१ मेपर्यंत बुजविण्यात यावेत, १५ मेनंतर नव्याने रस्ते खोदू नयेत, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. रस्त्यांवर खड्डे राहिल्यास त्याला कार्यकारी अभियंता जबाबदार राहतील, असेही आयुक्तांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. असे असतानाही शहरात अजूनही रस्तेखोदाईची कामे सुरू आहेत. जेथे खड्डे व्यवस्थित बुजविले गेले नसतील, त्या ठिकाणी कार्यकारी अभियंत्यांना जबाबदार धरले जात आहे. रस्ते दुरुस्तीसाठी पालिकेने मागील वर्षी सुमारे तीन कोटींची तरतूद केली होती. त्यामध्ये प्रत्येक प्रभाग समितीला २५ लाखांच्या निधीचा अंतर्भाव होता. (प्रतिनिधी)४महापालिका हद्दीत सध्याच्या घडीला ३४६९.०२ चौरस मीटर रस्त्यांची खोदाई झाली असून यापैकी २१४० चौरस मीटरचे रस्ते दुरुस्त करण्यात आले आहेत. आता पाऊस येण्यापूर्वी शहरातील सर्वच रस्ते सुस्थितीत यावेत, म्हणून आयुक्त व्हॉट्सअ‍ॅपवरील एमसीएस आॅफिस या ग्रुपवर रस्त्यांचे, नाल्यांचे अपडेट घेत आहेत. ज्या ठिकाणी रस्तेखोदाई झाली आहे, त्या ठिकाणचा फोटो आणि बुजविल्यानंतरचा फोटो हा प्रत्येक प्रभाग समितीच्या कार्यकारी अभियंत्याकडून टाकला जात आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामाला वेग आला आहे. ४एखादा रस्ता खोदला जात असला तरी तो लागलीच दुसऱ्या दिवशी बुजविला जात असून त्यावर डांबर टाकण्याचे काम पालिकेकडून होत आहे. आता पालिकेने रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांचा सर्व्हे सुरू केला असून दोन दिवसांत त्याचा अहवाल सादर होणार आहे.