मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ मार्गावरील महालक्ष्मी मेट्रो स्थानकावर भुयारीकरणाचा ३९वा टप्पा यशस्वीरीत्या पार पडला असून, मेट्रो-३ प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ५२.६ किलोमीटर म्हणजेच ९६.५ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली.
सायन्स म्युझियम ते महालक्ष्मी स्थानक दरम्यान भुयारीकरण आव्हानात्मक होते. या टप्प्यातील भुयारीकरण ८० वर्षांपेक्षा जास्त जुन्या इमारतींच्या आणि पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी आणि लोअर परेल स्थानकांच्या दरम्यान थेट रेल्वेमार्गाच्या खालून करण्यात आले आहे, असे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले.
टनेल बोरिंग मशीन तानसा-२ द्वारे सायन्स म्युझियम मेट्रो स्थानक ते महालक्ष्मी मेट्रो स्थानक हा अप लाइन मार्गाचा १११७.५ मीटर भुयारीकरणाचा टप्पा एकूण ७४५ रिंग्सच्या साहाय्याने २५७ दिवसात पूर्ण करण्यात आला. मेट्रो-३ मार्गिकेतील पॅकेज-३ मध्ये पाच स्थानके असून, याअंतर्गत मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.
पॅकेज-३च्या भुयारीकरण तपशील
१. सायन्स म्युझियम ते वरळी
(अप लाइन- २०७२ मीटर, डाऊन लाइन- २०५७ मीटर )
२. सायन्स म्युझियम ते महालक्ष्मी (अप लाइन- १११७.५ मीटर)