Join us  

३९३ गर्भवतींपैकी केवळ दोन बालक ‘पॉझिटिव्ह’; मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 1:25 AM

एचआयव्ही बाधित मातांकडून नवजात बालकांना होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे.

- स्नेहा मोरेमुंबई : एचआयव्ही बाधित मातांकडून नवजात बालकांना होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीच्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षात ३९३ गर्भवतींपैकी केवळ दोन बालकांना मातांकडून एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मागील काही वर्षांत वाढलेल्या जनजागृतीमुळे संसर्ग नियंत्रणात ठेवण्यावर यश येत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.संसर्गित मातेकडून बाळाला होणारे एचआयव्हीचे संक्रमण रोखण्यासाठी मातांमध्ये एचआयव्ही संक्रमणाचे निदान लवकर करणे व उपचार देणे हा एचआयव्ही नियंत्रणाचा मुख्य भाग आहे. याकरिता, संसर्गित मातेला गरोदरपणात चौथ्या महिन्यापासून बहुऔषधी एचआयव्हीनाशक उपचारपद्धती सुरू केली जाते. संसर्गित मातेच्या बालकाची एचआयव्ही संसर्गाची तपासणी जन्मापासून वयाच्या १८ महिन्यांपर्यंत केली जाते. त्यानुसार, सहा वर्षांत गर्भवतींमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे.२०१०-११ साली १ लाख ५६२ गर्भवती महिलांची तपासणी झाली. त्यातील ४६६ महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह होत्या. २०१६-१७ साली १ लाख २६ हजार ४३५ गर्भवती महिलांची तपासणी झाली. त्यातील १६२ महिला एचआयव्हीग्रस्त असल्याचे निदान झाले. २०१४-१५ साली २५५ गर्भवतींना एचआयव्हीचे निदान झाले होते. मात्र, २०१८-१९ या वर्षात हे प्रमाण १४७ वर आले आहे. टक्केवारीत पाहिले, तर एचआयव्ही बाधित मातांचे प्रमाण ४२. ४ टक्क्यांनी घटले आहे.शून्य संसर्ग, गैरसमज टाळण्यावर भरएड्स जनजागृतीसाठी शून्य संसर्ग, गैरसमज टाळण्यावर भर दिला जात अहे. रुग्णांनी कसा आहार घ्यावा, प्रोटिन्स कसे घ्यावेत आदींचे मार्गदर्शन आहारतज्ज्ञांच्या माध्यमातून रुग्णांना करण्यात येत आहे. एचआयव्हीचा धोका जास्त असणाºया या सर्व व्यक्तींची तपासणी, बाधित व्यक्तींचे सातत्याने आणि विनाशुल्क उपचार, त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींची तपासणी, वारंवार समुपदेशन अशी जनजागृतीची कामे करणे सुरू आहेत.असा थांबवा बाळापर्यंत संसर्गाचा प्रसारनवीन एमडीएआर या उपचार पद्धतीने एचआयव्हीचा प्रसार आपल्याकडून आपल्या बाळाकडे होणे थांबविले जाऊ शकते. याला पालकाकडून शिशुकडे प्रसार प्रतिबंधन उपाय असे नाव आहे. (प्रतिबंधासाठी प्रसूतीच्या वेळी आणि बाळाच्या जन्मानंतर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावे) बाळासाठी सुरक्षित आहारयोजनादेखील करावी. प्रसूतिपूर्व योग्य काळजी घ्या. एचआयव्हीसाठी आपले रक्त तपासून घ्या आणि जवळच्या केंद्रावर आपले नाव नोंदवा. जर बाळंतपणाला माहेरी जाणार असाल, तर सरकारी दवाखान्यातील आयसीटीसी केंद्राशी संपर्क साधा आणि तिथल्या समुपदेशकांशी चर्चा करावी.एकही बाधित रुग्ण नजरेतून सुटू नये हाच प्रयत्नगेल्या काही वर्षांत जनजागृतीमुळे एचआयव्हीविषयी समाजातील विविध घटकांमध्ये जनजागृती होत आहे. यंदा केवळ दोन बालकांना एचआयव्हीची लागण झाली आहे. मात्र, मागील काही वर्षांत हे प्रमाण ११ त्यापूर्वी आठ असे होते. त्यामुळे त्या तुलनेत ही घट झाल्याचे सकारात्मक चित्र आहे. त्याप्रमाणे, रुग्ण केंद्रापर्यंत येण्याची वाट न पाहता रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. एकही बाधित रुग्ण नजरेतून सुटू नये, असा प्रयत्न असतो.- डॉ. श्रीकला आचार्य,प्रकल्प संचालिका, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटी

टॅग्स :मुंबई