राजू काळे, भार्इंदरमीरा-भार्इंदर मतदारसंघात मतदानावेळी ३ लाख ६४ हजार ८९२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी ३८६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून मतदान चोख व्यवस्थेत पार पाडण्यासाठी अडीच हजार पोलिसांसह निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रचाराचा धुराळा खाली बसल्यानंतर आता निवडणूक प्रशासन १५ आॅक्टोबरच्या मतदानासाठी सज्ज झाले आहे. मतदान केंद्रांसाठी शासकीय कार्यालयांसह खाजगी व पालिकांच्या शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. मतदानाला सकाळी ७ वा. सुरुवात होणार असून त्याआधी सकाळी ६ च्या सुमारास उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना मतदान यंत्रांसह त्यांच्या साहित्यांचा डेमो देण्यात येणार आहे. त्यानंतर, मतदान यंत्रे सील करून मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मतदानावेळी मतदारांना रेशनकार्डखेरीज आधार, पॅन, मनरेगा जॉब, विमा, पेन्शन कार्ड, पासपोर्ट, बँक आणि पोस्टाचे पासबुक, शासकीय ओळखपत्र, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही व ड्रायव्हिंग लायसन्स पुरावा म्हणून सादर करावा लागणार आहे. परंतु, ज्या मतदारांकडे मतदार ओळखपत्रासह निवडणूक प्रशासनाने जारी केलेली फोटोयुक्त व्होटर स्लीप आहे, अशांना इतर पुराव्यांची आवश्यकता राहणार नाही. त्यासाठी मतदान केंद्रांत निवडणूक प्रशासनाकडून बॅनरच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असल्याने बहुतांशी मतदार शहरातच राहणार असल्याचे गृहीत धरून यंदाच्या मतदानाची टक्केवारी गतवेळेपेक्षा नक्कीच वाढणार असल्याची शक्यता निवडणूक प्रशासनाने वर्तविली आहे. यंदाच्या निवडणुकीत संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आल्याचे निवडणूक आणि पोलीस प्रशासनाने सांगितले. तरीही, निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
मतदानासाठी ३८६ मतदान केंद्रे
By admin | Updated: October 14, 2014 23:21 IST