Join us  

मुंबईत कोविड रुग्णांसाठी ३७७७ रिक्त खाटा, आणखी ११०० बेड वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 8:32 PM

आयसीयू - ऑक्सिजन खाटा अधिक

ठळक मुद्देमुंबईतील सक्रिय रुग्णांचा आकडा सुमारे एक लाखापर्यंत पोहोचला आहे. दररोज नऊ ते दहा हजार बाधित रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत होत्या

मुंबई - कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मुंबईतील खाटांची क्षमता टप्याटप्याने वाढविण्यात येत आहे. सध्या कोविड रुग्णांसाठी राखीव ३७७७ खाटा रिकाम्या असून एका आठवड्यात आणखी ११०० खाटा वाढविण्यात येणार आहेत. तर प्रत्येकी दोन हजार खाटांचे तीन जम्बो रूग्णालय पुढील पाच ते सहा आठवड्यांत उभारणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी दिली. 

मुंबईतील सक्रिय रुग्णांचा आकडा सुमारे एक लाखापर्यंत पोहोचला आहे. दररोज नऊ ते दहा हजार बाधित रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत होत्या. बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावे, यासाठी महापालिकेने टप्याटप्याने खाटांची संख्या वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कोविड रुग्णांसाठी सध्या १४१ रुग्णालयांमध्ये १९ हजार १५१ खाटा राखीव आहेत. यापैकी ३७७७ खाटा रिकाम्या आहेत.

आयसीयू खाटा, ऑक्सिजन खाटा वाढणार...

रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयसीयू खाटा तसेच ऑक्सिजन खाटांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे. मात्र लवकरच ३२५ आयसीयू खाटा वाढविणार असल्याने एकूण २४६६ आयसीयू खाटा यापुढे उपलब्ध होणार आहे. तर आणखी आठवड्याभरात वाढविण्यात येणाऱ्या ११०० खाटांपैकी १२५ आयसीयू खाटा असणार आहेत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

७० टक्के ऑक्सिजन खाटा....

येत्या पाच ते सहा आठवड्यात राज्य शासनामार्फत मुंबईत शहर व उपनगरांमध्ये प्रत्येकी एक असे तीन जम्बो फील्ड रुग्णालय उभारण्यात येणार आहेत. या प्रत्येक रुग्णालयामध्ये दोन हजार खाटांची क्षमता असणार आहे. तसेच दोनशे आयसीयू खाटा तर ७० टक्के ऑक्सिजन खाटा असणार आहेत.

पंचतारांकित हॉटेलचे कोरोना केंद्रात रूपांतर...

मुंबईतील काही चतुर्थ श्रेणी व पंचतारांकित हॉटेल्सचे रूपांतर कोविड काळजी केंद्र २ मध्ये रुपांतर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यामुळे तब्येतीत सुधारणा झालेल्या रुग्णाला तिथे हलवून रुग्णालयातील खाट अन्य गरजू रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकेल. या केंद्राचे व्यवस्थापन मोठ्या खाजगी रुग्णालयांकडे सोपविण्यात येणार आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईकोरोनाची लस