उरण : केंद्र सरकारच्या अखत्यारीत उरण परिसरातील द्रोणागिरी नोडमध्ये असलेले सीडब्लूसी गोडावून मागील ११ महिन्यांपासून बंद पडल्याने ३७३ कामगारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. सीएफएस व्यवस्थापनाचे कामगारविरोधी धोरण आणि निष्काळजीपणामुळे येथील भूमिपुत्र कामगारांवर अशी उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. त्याशिवाय केंद्र सरकारलाही आर्थिक उत्पन्नाला मुकावे लागत आहे. यामुळे कामगारवर्गात तीव्र असंतोष पसरला आहे.उरण परिसरातील द्रोणागिरी नोडमध्ये असलेले सीडब्लूसी गोडावून मागील ११ महिन्यांपासून बंद पडले आहे. या सीडब्लूसी प्रशासनाच्या अव्यवहार्य आणि अनाकलनीय हेतूमुळे या सीडब्लूसी गोडावूनमध्ये कोणताही ठेकेदार काम करण्यास तयार नाही. त्यामुळेच सीडब्लूसी गोडावून बंद पडले आहे. गोडावून पुन्हा सुरू करण्याबाबत कामगार, कामगार संघटना आणि सीडब्लूसी गोडावून स्थानिक सीडब्लूसी प्रशासन, दिल्लीतील व्यवस्थापकीय संचालक, केंद्रीय मंत्री यांच्यामध्ये मागील ११ महिन्यांत झालेल्या चर्चा आणि बैठका निष्फळ ठरल्या आहेत.येथील दोन ठेकेदार कंपन्यांनी कामगारांचे प्रॉव्हिडंट फंडाचे एक कोटी साठ हजार रुपये पीएफ खात्यात जमा केलेले नाहीत. प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम कामगारांच्या खात्यात जमा केलेली नसतानाही मात्र सीडब्लूसी प्रशासनाने ठेकेदार कंपनीला पूर्ण पेमेंंट केले आहे. १५ जुलैपासून ३७३ कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलनासह टप्प्याटप्प्याने रास्ता रोको आंदोलनापर्यंत सुरू करण्याचा इरादाही जाहीर केला आहे. (वार्ताहर)
३७३ कामगारांवर उपासमारीचे संकट
By admin | Updated: July 13, 2015 22:20 IST