मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असतानाच मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास मालाड पूर्वेकडील कुरार व्हिलेज येथील आंबेडकरनगरमध्ये दरड परिसरातील दगड कोसळले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणाला ईजा झाली नसली, तरी सुरक्षेच्या कारणास्तव सुमारे ३५० रहिवाशांना पारेखनगर येथील कुरार महापालिकेच्या शाळेत तात्पुरत्या निवाऱ्यात स्थलांतरित करण्यात आले आहे. येथील दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेसह वनविभागाचे कर्मचारीदेखील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.
आमच्या जिवाला धोका असून, आमचे पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करावे, या प्रमुख मागणीसाठी मालाड, कुरार व्हिलेज, आंबेडकरनगरमधील रहिवाशांनी आंदोलन छेडले होते. आंदोलनाची दखल घेत लोकप्रतिनिधींनी रहिवाशांना पंधरा दिवसांत न्याय देऊ, असे आश्वासन दिले. मात्र, आजही आंबेडकरनगर येथील सुमारे दोनशे कुटुंबे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असून, दरडीच्या खाली आम्ही गाडले गेल्यानंतर, सरकार जागे होणार आहे का? असा सवाल आंबेडकरनगर येथील रहिवाशांनी केला होता. आंबेडकरनगर येथे दरडीच्या परिसरात सुमारे दोनशे कुटुंबे जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत. प्रत्येक पावसाळ्यात या कुटुंबांचे मोठे हाल होतात. शिवाय, इतर अनेक नागरी सुविधांपासून देखील येथील रहिवासी वंचित आहेत. कांदिवली आणि मालाड येथे म्हाडा व एसआरए यांची कित्येक घरे रिकामी पडून आहेत. आंबेडकरनगरमधील दोनशे कुटुंबीयांचे येथे पुनर्वसन केले, तर हा प्रश्न तत्काळ निकाली निघू शकतो, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालय या प्रकरणात काहीच कार्यवाही करीत नसल्याने रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत.