Join us
Daily Top 2Weekly Top 5

३५ हजार पोलिसांचा तुमच्यावर वॉच

By admin | Updated: December 31, 2015 04:24 IST

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर आतूर झाले असताना त्यांच्या आनंदात विघ्न पडू नये, यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले असून, शहर व उपनगरात गुरुवारी दुपारपासून सुमारे ३५ हजारांवर

मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर आतूर झाले असताना त्यांच्या आनंदात विघ्न पडू नये, यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले असून, शहर व उपनगरात गुरुवारी दुपारपासून सुमारे ३५ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे. ३१ डिसेंबरमुळे पोलिसांच्या गुरुवारच्या साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. चौपाटी, हॉटेल, बारबरोबरच प्रत्येक रस्ते, कोपऱ्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. नववर्षाचे स्वागत करत असताना कोणतेही गैरकृत्य, गैरप्रकार होऊ नये, यासाठी संशयास्पद व्यक्ती, वस्तूंबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी केले आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक विभागाकडून विशेष मोहीम राबविली जात आहे. प्रमुख मार्ग व कोपऱ्यावर नाकाबंदी करून तपासणी सुरू करण्यात आली आहे. तरुणी, महिलांची सुरक्षितता, अतिरेकी व घातपाती कृत्याला प्रतिबंध आणि ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह या प्रमुख तीन बाबींवर मुंबई पोलिसांनी बंदोबस्तावर भर दिला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक असे ९२ महिला छेडछाड प्रतिबंध पथके बनविण्यात आली आहेत. १ जानेवारीपर्यंत ही पथके गस्त घालणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व प्रमुख ठिकाणे, हॉटेल्स, मॉल्स, पार्टीच्या ठिकाणी विशेष बंदोबस्त असेल. दारू पिऊन तसेच हेल्मेट न घालता गाडी चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)