Join us
Daily Top 2Weekly Top 5

नालेसफाई करताना जमीन खचल्यामुळे ३५ दुकानगाळे कोसळले

By admin | Updated: May 26, 2016 01:49 IST

नाल्यांची मान्सूनपूर्व सफाई करण्याच्या कामात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू असताना त्याबाबत आवश्यक खबरदारी न घेण्याचा मोठा फटका कुर्ला नेहरूनगरातील

मुंबई : नाल्यांची मान्सूनपूर्व सफाई करण्याच्या कामात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू असताना त्याबाबत आवश्यक खबरदारी न घेण्याचा मोठा फटका कुर्ला नेहरूनगरातील दुकानदारांना बसला. जेसीबीच्या साहाय्याने नाल्यातील गाळ काढला जात असताना धक्का लागल्यामुळे जमीन खचून नाल्याच्या बाजूला असलेले सुमारे ३० ते ३५ दुकानगाळे नाल्यात कोसळले. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. सकाळी सातच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेवेळी बहुतांश दुकानगाळे बंद होते, वर्दळही कमी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कोट्यवधींच्या मालमत्तेची हानी झाली आहे. पालिकेच्या गाफील कारभारामुळे हा प्रकार घडल्याने त्यांनी भरपाई द्यावी, अशी मागणी संतप्त दुकानदारांकडून व्यक्त होत आहे. कुर्ला नेहरूनगर नाल्याच्या बाजूला सुमारे २० वर्षांपासून दुकान गाळे आहेत. यामध्ये काही हॉटेल, काहींचे कार्यालय तर काही खासगी क्लासेसदेखील आहेत. ग्राहकांमुळे हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी पालिकेकडून या ठिकाणी नाल्यांच्या सफाईचे काम गेल्या ४-५ दिवसांपासून सुरू आहे. नाल्याचा गाळ काढण्यासाठी जेसीबी मशिनचा वापर केला जात आहे.त्यामुळे नाल्याच्या रुंदीमध्ये काही प्रमाणात वाढ होऊन त्याचा धक्का काठावरील जमिनीवर बसत गेला. त्यामुळे ती खचून सकाळी सातच्या सुमारास काही दुकाने अचानक नाल्यात कोसळली. ही बाब काही दुकानदार आणि हॉटेल चालकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ दुकानांमधून बाहेर पडत स्वत:चा जीव वाचवला.लागोपाठ एकामागोमाग एक पत्त्याप्रमाणे गाळे तुटून पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी परिसरातून सर्व नागरिकांना बाजूला काढले. नाल्यात व बाजूला गाळ्यातील विविध प्रकारच्या वस्तू विखुरल्या होत्या. सायंकाळपर्यत ते बाजूला काढण्याचे काम सुरू होते. नुकसानभरपाईची मागणी : नाल्याच्या काठावरील दुकान गाळ्यांचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने ही दुकाने काही मिनिटांमध्ये पूर्णपणे कोसळली. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे पालिकेने दुकानदारांचे झालेले सर्व नुकसान भरून द्यावे, अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.