Join us  

मेट्रोच्या कामामुळे बेस्टचे ३५ कोटींचे नुकसान, ७५ बस स्टॉप हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 2:18 AM

मेट्रो रेल्वेच्या विकासासाठी झाडांनंतर बेस्ट उपक्रमाचे बस स्टॉपही हटविण्यात आले आहेत. आतापर्यंत असे ७५ बस थांबे काढण्यात आले असून आणखी ७० बसथांबे उखडले जाणार आहेत. यामुळे बेस्टचे ३५ कोटी रुपये बुडाले आहेत. बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असल्याने ही नुकसानभरपाई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने त्वरित द्यावी, अशी मागणी बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांंनी केली आहे.

मुंबई : मेट्रो रेल्वेच्या विकासासाठी झाडांनंतर बेस्ट उपक्रमाचे बस स्टॉपही हटविण्यात आले आहेत. आतापर्यंत असे ७५ बस थांबे काढण्यात आले असून आणखी ७० बसथांबे उखडले जाणार आहेत. यामुळे बेस्टचे ३५ कोटी रुपये बुडाले आहेत. बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असल्याने ही नुकसानभरपाई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने त्वरित द्यावी, अशी मागणी बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांंनी केली आहे.संपूर्ण मुंबईत मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. या कामामुळे मुंबईकरांची गैरसोय होत असल्याचे पडसाद स्थापत्य समितीमध्ये गेल्या आठवड्यात उमटले. नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी याबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. या वेळी एमएमआरसीएलचे अधिकारीही बैठकीला उपस्थित होते. या अधिकारी वर्गासमोरच कोकीळ यांनी मेट्रोमुळे बेस्टचे कसे नुकसान झाले आहे याची माहिती दिली. कुलाबा-सीप्झ, दहिसर-मंडाले, डी.एन. नगर ते वांद्रे या पट्ट्यात मेट्रोची कामे सुरू आहेत. मेट्रोच्या कामांमुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या अनेक बसगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.या बदललेल्या मार्गामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट तर इंधन खर्चात वाढ झाली आहे. बसथांबे पूर्वकल्पना न देता उखडण्यात आल्याचा आरोप कोकीळ यांनी केला. या प्रकरणी त्यांनी मेट्रो रेल्वे कॉर्पाेरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.बसथांब्यावर जाहिराती प्रदर्शित करून त्याद्वारे मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. प्रवासी बेस्टकडे पाठ फिरवू लागले आहेत. त्यामुळे बेस्टचे तब्बल ३५ कोटींचे नुकसान झाले असल्याचा दावा अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी या पत्रात केला आहे. ही नुकसानभरपाई मेट्रोने द्यावी, अशी मागणी त्यांनी पत्रामार्फत केली आहे.

टॅग्स :मेट्रोमुंबई