Join us
Daily Top 2Weekly Top 5

३४ टक्के अँटिजन चाचण्या फाॅल्स निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - राज्यात सध्या ६० टक्के चाचण्या अँटिजन स्वरूपात करण्यात येत आहेत. या अँटिजन चाचण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यात सध्या ६० टक्के चाचण्या अँटिजन स्वरूपात करण्यात येत आहेत. या अँटिजन चाचण्यात फाॅल्स निगेटिव्ह आलेल्या ३३.७ टक्के चाचण्या आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आल्याचे एका राष्ट्रीय अभ्यासात समोर आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यास करण्यात आला आहे.

या अभ्यासाकरिता ४१२ रुग्णांच्या अँटिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १३९ चाचण्या आरटीपीसीआरमध्ये पॅाझिटिव्ह आल्याचे दिसून आले आहे. या १३९ पॅाझिटिव्ह रुग्णांपैकी ९१ लक्षणे असलेले, तर ४८ रुग्ण हे लक्षणविरहित दिसून आले आहेत.

डॉ. स्मिता महाले यांनी या अभ्यासाविषयी सांगितले, अँटिजन चाचण्यांमध्ये फाॅल्स निगेटिव्ह येण्याचे प्रमाण अधिक असते. केवळ एखाद्या भागात संसर्गाची तीव्रता मोठ्या प्रमाणात तपासण्यासाठी या अँटिजन चाचण्या करण्यात येतात. मात्र, दुसऱ्या बाजूला आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये अधिक अचूकता आणि पारदर्शकता दिसून येते.

देशभरात डेल्टा व्हायरसचे २० नमुने

देशभरात तपासलेल्या एकूण नमुन्यांपैकी २० नमुने हे डेल्टा विषाणूचे असल्याचे समोर आले आहे. यात आठ नमुने राज्यातील असल्याचे दिसून आले आहे. यात सर्वाधिक नमुने रत्नागिरीतील आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडू, महाराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेश आदी राज्यांत डेल्टा विषाणूचे नमुने सापडले आहेत. राज्यातील पाच जिल्ह्यांमधून गोळा झालेल्या २० नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला आहे. नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरी डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला. त्यानंतर आम्ही आणखी नमुने घेतले असून, ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, त्याचा रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे.