लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीच्या ३२ मुंबईकर विद्यार्थ्यांनी यंदा १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत. राज्यात १०० % गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ९५७ आहे. निकालाच्या उत्तीर्णतेची टक्केवारीही यंदा अंतर्गत मूल्यमापनामुळे वाढली असली तरी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थी संख्येतही वाढ झाली आहे. यंदा मुंबई विभागातील नव्वदीपार शाळांची संख्या १५ हजार ५४० इतकी आहे. मागील वर्षी या विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार ७५६ होती.
यंदा ९० हून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ४.१९ % इतकी आहे. नव्वदीपार असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा जास्त असल्याने अकरावी प्रवेशासाठी चुरसही वाढणार आहे.
यंदा पुनर्मूल्यांकन नाही
दरवर्षी दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर समानाधी नसतील तर त्यांना पुनर्मूल्यांकनाची संधी दिली जाते. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करता येताे. अर्ज भरल्यानंतर साधारणपणे १५ दिवसांमध्ये मंडळाकडून दहावीचा पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर होतो. पण, यंदा मात्र विद्यार्थ्यांना अशी संधी मिळणार नाही. तरीही जे विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापन पद्धतीवर समाधानी नसतील आणि आपली नापसंती बोर्डाकडे कळवतील त्यांच्यासाठी वेगळी परीक्षेची संधी उपलब्ध होणार असल्याचे याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे.
टक्केवारीनिहाय विद्यार्थी संख्या
९० % आणि त्याहून अधिक - १५,५४० - ४.१९
८५ % ते ९० % - २१,९९२ - ५.८७
८०% ते ८५ % - ३२,२९४ - ८.६२
७५ % ते ८० % - ४१,९९२ - ११.२१
७० % ते ७५% - ४९,९६५ - १३.३४
६५ % ते ७० % - ५५,०५३ - १४.७०
६० % ते ६५ % - ५९,२६४ - १५.८२
४५ % ते ६० % - ७९,५८७ - २१.२५
४५ % टक्क्याहून कमी - १८,८३२ - ५.२८