Join us
Daily Top 2Weekly Top 5

थायलंडच्या बौद्ध उपासकांकडून भारताला ३१ रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:06 IST

‘मैत्री थाई’ प्रकल्पातील रुग्णवाहिका विविध शहरात रवानालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी थायलंडच्या ...

‘मैत्री थाई’ प्रकल्पातील रुग्णवाहिका विविध शहरात रवाना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी थायलंडच्या बौद्ध उपासकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ‘मैत्री थाई’ प्रकल्पातून तब्बल ३१ रुग्णवाहिका भारताला मिळाल्या आहेत. थायलंडचे कौन्सुलेट जनरल थानावत सिरिकुल, महाराष्ट्राचे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, दिल्लीचे अनिश गोयल आणि भिक्खू संघाच्या उपस्थितीत पुण्यातील कार्यक्रमात या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

थायलंडच्या थेरवादा फॉरेस्ट ट्रॅडिशनचे भन्ते अजान जयासारो यांनी थायलंडमधील बौद्ध उपासकांना भारताला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्या मदतीतून भारतासाठी नव्या ३१ रुग्णवाहिका घेण्यात आल्या. शनिवारी पुण्यात टाटा मोटर्समध्ये आयोजित कार्यक्रमात या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. ‘मैत्री थाई’ प्रकल्पातून आलेल्या ३१ रुग्णवाहिका या बोधगया, सारनाथ, राजगीर, कुशीनगर, लेह-लद्दाख या बौद्ध स्थळांसह नागपूर, औरंगाबाद, बंगळुरू, दिल्लीसह देशातील विविध ३१ जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय सुविधा पुरविणार आहेत.

यावेळी कौन्सुल जनरल सिरिकुल म्हणाले की, ‘मैत्री थाई’ प्रकल्पामुळे थायलंड आणि भारत यामधील मैत्रीचे दर्शन घडले असून, याचा सर्वांना फायदा होणार आहे. डॉ. हर्षदीप कांबळे यांनी हे सर्व घडवून आणण्यात फार मोलाची मदत केली असा उल्लेख करून त्यांच्या पुढाकाराचे सिरिकुल यांनी कौतुक केले, तर तथागत बुद्धांचा देश म्हणून थायलंडचे नागरिक भारताचा आदर करतात. बुद्ध धम्माच्या दानपरिमितेला अनुसरून या ३१ रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या आहेत, असे सांगून विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी भन्ते अजान जयासारो आणि थायलंडमधील उपासकांचे भारतीयांच्या वतीने आभार मानले. टाटा मोटर्स आणि एक्सेल व्हेइकल्स यांनी अतिशय विक्रमी कमी वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही कांबळे यांनी आभार मानले.

थायलंडमधून भारताला दुसऱ्यांदा वैद्यकीय सहायता मिळाली असून, हर्षदीप कांबळे आणि त्यांच्या पत्नी रोजाना कांबळे यांच्या समन्वयातून ही वैद्यकीय मदत प्राप्त झाली आहे. एखाद्या धर्माच्या अनुयायांकडून दानभावनेने साहाय्यासाठी एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने रुग्णवाहिका देण्यात आल्या. याबद्दल परमपूज्य भन्ते अजान जयसारो यांच्यासह थायलंडमधील सर्व बौद्ध उपासकांचे आभार मानले जात आहेत.