मुंबई : गणेशोत्सवादरम्यान मिठाई, पेढे, माव्याचा खप वाढतो. यामुळे भेसळयुक्त मिठाई अथवा कमी दर्जाची मिठाई मोठ्या प्रमाणात विकली जाण्याची शक्यता असते. म्हणून गेल्या आठवडाभरात एकट्या ठाणे परिसरात धाडी टाकून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ३ हजार ५ किलो मिठाई जप्त केली आहे. ठाणे, मीरा रोड, भार्इंदर आणि कल्याण परिसरातील विविध मिठाईच्या दुकानांवर एफडीएने धाडी टाकल्या आहेत. या धाडींमध्ये बर्फी, स्पेशल बर्फी, राधे बर्फी, गोड मावा, मिठाई असे पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या पदार्थांची किंमत अंदाजे ५ लाख ७३ हजार रुपये इतकी आहे. गणपतीच्या दर्शनाला जाताना अथवा गणपतीचे दर्शन घ्यायला आलेल्या भक्तांना प्रसाद म्हणून पेढे, बर्फी दिले जातात. यामुळे या काळात मिठाई, पेढे, बर्फीचा खप जास्त वाढतो. अनेक मिठाईवाले या काळात नफा मिळवण्यासाठी दर्जाकडे दुर्लक्ष करतात. बर्फी, पेढे, मिठाई करताना दिलेल्या प्रमाणानुसार बनवलेली नाही, तर ती मानवी आरोग्यास घातक ठरते. या काळात मिठाई मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यात भेसळ असल्यास अनेकांना एकाच वेळी त्रास होऊ शकतो. यासाठीच गणेशोत्सव काळात विशेष मोहीम एफडीएने हाती घेतली आहे. गोड मावा, बर्फी, मिठाई बनवण्याची जागा अस्वच्छ असणे, मिठाई आखून दिलेल्या प्रमाणात बनवलेली नसणे, तर काही ठिकाणची मिठाई ही खाण्यायोग्य नसल्याने ही मिठाई जप्त करण्यात आली. या मिठाईवाल्यांना दर्जा सुधारण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. यानंतरही दर्जा न सुधारल्यास त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल. ताब्यात घेतलेले नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. गणेशोत्सवापासून सुरू केलेली ही मोहीम दिवाळीपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती एफडीएचे साहाय्यक आयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांनी दिली. (प्रतिनिधी)
आठवडाभरात एफडीएकडून ३ हजार किलो मिठाई जप्त
By admin | Updated: September 21, 2015 02:43 IST