Join us  

मोेटरमनमुळे २० वर्षीय तरुणाला मिळाले जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 1:00 AM

लोकल थांबवून जखमी तरुणाला लोकलमध्ये बसविले

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील मोटरमन के. बी. चौधरी यांनी लोकल थांबवून रेल्वे रुळावर पडलेल्या २० वर्षीय जखमी तरुणाचे प्राण वाचविले. तरुणाला योग्यवेळी वैद्यकीय मदत पुरविण्यात आली. त्यामुळे त्याला जीवनदान मिळाले. मध्य रेल्वे प्रशासनाकडून मोटरमनला सन्मानित करण्यात येणार आहे.२३ सप्टेंबर रोजी कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर सीएसएमटी ते ठाणे लोकल मोटरमन के. बी. चौधरी चालवत होते. रात्री ९.४५ च्या सुमारास सायन ते कुर्ला यादरम्यान लोकल जात असताना रेल्वे रुळावर २० वर्षीय नवीन भारती हा तरुण जखमी अवस्थेत पडलेला होता. हा तरुण हातवारे करून मदत मागत होता. ही बाब मोटरमनच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ आपत्कालीन ब्रेक दाबून लोकल थांबविली.लोकल थांबेपर्यंत गार्डचा डबा आला होता. या वेळी गार्ड महेश के. यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने त्या तरुणाला शेजारी असलेल्या महिलांच्या डब्यात ठेवले. मोटरमनने घडलेली माहिती कुर्ला स्टेशन मास्तरांना दिली. स्टेशन मास्तर आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी स्ट्रेचर तयार ठेवले.कुर्ला स्थानकात लोकल येताच तरुणाला खाली उतरविले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले. भाडुंप येथे राहणारा नवीन भारती (२०) या तरुणाने सोमवारी रात्री घरी जाण्यासाठी दादर स्थानकातून लोकल पकडली. गर्दी असल्याने सायन ते कुर्ला स्थानकांदरम्यान नवीन पडल्याची घटना घडली, अशी माहिती नवीनच्या मित्राने दिली.मोटरमन बी. के. चौधरी, गार्ड महेश के., रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि कुर्ला स्थानकाचे स्टेशन मास्तर यांनी तातडीने मदतकार्य पोहोचविले. एका जखमी प्रवाशाचा जीव वाचला. या कामगिरीबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून सन्मानित करण्यात येणार आहे.- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :मध्य रेल्वे