मुंबई : मुंबई शहरात अनेक उपाययोजना करूनही डेंग्यूच्या रुग्णांचा आलेख नोव्हेंबर महिन्यातही चढता दिसून येत आहे. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांचे बळी गेले आहेत. डेंग्यूच्या तापामध्ये प्लेटलेट्स कमी होत असल्याने शहरात अनेकांना प्लेटलेट्सची गरज भासते. यामुळे रक्तपेढ्यांमध्ये काही प्रमाणात रक्त कमी झाले आहे. हे लक्षात घेऊन नायर रुग्णायलात आणि सिद्धिविनायक मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही रक्तदान शिबिरांमध्ये मिळून २९४ रक्ताच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या आहेत. पावसाळा संपून एक महिना उलटला तरीही वातावरणात गारवा निर्माण झालेला नाही. अशा प्रकारचे वातावरण हे डासांची पैदास होण्यास योग्य असते. यामुळेच अजूनही डेंग्यूच्या डासांची पैदास होताना आढळत आहे. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक असणाऱ्या नायर रुग्णालयामध्ये मॉर्ड आणि रुग्णालय प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयाचे कर्मचारी, निवासी डॉक्टर, विद्यार्थी यांनी रक्तदान केले. नायर रुग्णालयामध्ये एकूण ६४ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फेदेखील याच कारणास्तव रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. भक्तांनी या शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला. न्यासातर्फे २३० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. भविष्यात अजून काही रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येईल, असे न्यासातर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
एका दिवसात संकलित झाल्या २९४ रक्ताच्या बाटल्या
By admin | Updated: November 8, 2014 01:11 IST