Join us

ठकसेनाकडून २८ लाखांचा गंडा : आंतरराज्य गुन्हेगार ,खतरनाक गुन्हेगार

By admin | Updated: August 26, 2014 23:57 IST

सात दिवसांची कोठडी; उत्तर प्रदेशमध्ये खुनाचे तीन गुन्हे

सांगली : येथील राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने काल, सोमवारी अटक केलेल्या प्रेमसिंग ऊर्फ अजय शेरपालसिंह कुशवाह-ठाकूर (वय ३०, रा. अलिगढ, उत्तर प्रदेश) या ठकसेनाने ओम फायनान्शिअल सर्व्हिस प्रा. लि., ही तथाकथित कंपनी काढून चार टक्के व्याजाने कर्ज देण्याचे आमिष दाखविले व सांगली जिल्ह्यातील १४६ जणांना सुमारे २८ लाखांचा गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या आंतरराज्य गुन्हेगाराविरुद्ध उत्तर प्रदेशमध्ये तीन खून, खुनाचे तीन प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच महाराष्ट्रातील सांगली, जालना, परभणी, वर्धा, गडचिरोली, अकोला, नांदेड, मालेगाव या पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.ठाकूर याने २०११ मध्ये सांगलीत ओम फायनान्शिअल कंपनी काढली होती. चार टक्के व्याज दराने लाखापासून ते कोटीपर्यंत कर्ज देण्याचे आमिष त्याने दाखविले. या आमिषाला बळी पडून शहरातील, तसेच जिल्ह्यातील लोकांनी त्याच्याशी संपर्क साधला. लोकांची गर्दी वाढू लागल्याने त्याने शहरात आणखी दोन कार्यालये थाटली. कर्ज मंजूर करण्यासाठी त्याने लोकांकडून पाच हजार प्रोसेसिंग फी, २० हजार अ‍ॅग्रीमेंट फी, दीड हजार व्हेरिफिकेशन फी अशाप्रकारे २७ हजार रुपये आयसीआयसीआय बँक व स्टेट बँक, अलिगढ शाखेत स्वत:च्या खात्यावर जमा करण्यास सांगितले. त्यानुसार लोकांनी कर्जमंजुरीसाठी ही रक्कम भरली. वर्षभरात त्याने जिल्ह्यातील १४६ लोकांकडून २८ लाख रुपये गोळा केले. त्यानंतर येथील कार्यालय बंद करून गाशा गुंडाळला होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लोकांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. फसगत झालेल्यांपैकी गोमेवाडी (ता. आटपाडी) येथील मेघराम सोहनी यांनी ३० मार्च २०१२ रोजी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार ठाकूरसह दिलीप शर्मा, व्ही. पी. सिंग, नितीन अरोरा (सर्व रा. अलिगढ, उत्तर प्रदेश) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणुकीची व्याप्ती वाढल्याने १० एप्रिल २०१२ रोजी शहर पोलिसांकडून हा तपास काढून घेऊन तो सीआयडीकडे सोपविला होता. सीआयडीचे पथक गेल्या दीड वर्षापासून संशयितांचा शोध घेत होते. मात्र त्यांचा सुगावा लागत नव्हता. ठाकूर हा उत्तर प्रदेशमधील सासनिगेट कारागृहात एका खुनाच्या गुन्ह्यात बंदी असल्याचे समजले होते.पोलीस उपअधीक्षक एन. आर. पन्हाळकर यांच्या पथकाने अलिगढ न्यायालयाच्या आदेशाने त्याचा दोन दिवसांपूर्वी ताबा घेतला होता. त्याला घेऊन पथक काल (सोमवार) रात्री सांगलीत दाखल झाले. त्यानंतर त्याला अटक केली. आज (मंगळवार) त्याला न्यायालयात उभे करण्यात आले होते. सरकारी वकिलांनी त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. यावर न्यायालयाने सात दिवसांची कोठडी सुनावली आहे. खतरनाक गुन्हेगारठाकूर हा खतरनाक गुन्हेगार आहे. २००२ मध्ये पहिल्यांदा तो उत्तर प्रदेशमधील क्वार्सी येथे बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी रेकॉर्डवर आला. या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याचा गुन्हेगारी प्रवास वाढतच गेला. उत्तर प्रदेशमधील सासनिगेट, क्वार्सी, सिव्हिल लाईन, मडराक या पोलीस ठाण्यात तीन खून, खुनाचे तीन प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगणे, टोळी तयार करून गुन्हे करणे असे गुन्हे दाखल आहेत. २०११ मध्ये मडराक पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून करून तो सांगलीत आश्रयाला आला. साथीदारांच्या मदतीने त्याने ओम फायनान्शिअल कंपनी काढली होती. उत्तर प्रदेश व महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत त्याच्याविरुध्द विविध २६ गुन्हे दाखल आहेत.मालमत्तेचा शोधउपअधीक्षक पन्हाळकर म्हणाले की, ठाकूरची कसून चौकशी सुरू आहे. फसवणुकीने मिळविलेल्या रकमेचा विनियोग त्याने कसा केला, रक्कम कुठे गुंतविली आहे का, याचा शोध घेतला जाणार आहे. आयसीआयसीआय व स्टेट बँकेत त्याची खाती आहेत का? असतील तर ती गोठविली जातील. गरज पडल्यास त्याला घेऊन तपासासाठी उत्तर प्रदेशला जाणार आहे.