Join us

मांत्रिकाच्या तावडीतून २८ मुलांची सुटका

By admin | Updated: June 12, 2016 04:06 IST

समतानगरमध्ये अडीअडचणी घेऊन येणाऱ्या धनदांडग्यांना सुखशांती मिळावी म्हणून यासाठी तेथील मुलांकडून जबरदस्तीने मंत्रजप करुन घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर

मुंबई : समतानगरमध्ये अडीअडचणी घेऊन येणाऱ्या धनदांडग्यांना सुखशांती मिळावी म्हणून यासाठी तेथील मुलांकडून जबरदस्तीने मंत्रजप करुन घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याचप्रमाणे त्यांचे शारीरिक शोषण व त्यांना मारहाणही होत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी मांत्रिकाच्या तावडीतून २८ मुलांची सुटका केली आणि मांत्रिकाला जेरबंद केले.समतानगरमधील एका बंगल्यात २४ तास मंत्रजाप सुरु असायचा. बंगल्याबाहेर वाढत असलेल्या गर्दीला पाहून एका स्वयंसेवी संस्थेला संशय आला. त्यांनी याबाबत समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन समताननगर पोलिसांनी छापा टाकला. त्यांनी केलेल्या कारवाईत मांत्रिक मनोज दुबेचा प्रताप उघडकीस आला. पोलिसांनी तत्काळ त्याच्या तावडीतून २८ मुलांची सुटका केली. यामध्ये १२ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धन धांडग्यांना सुखशांती मिळावी म्हणून तो या मुलांना एका पायावर उभा करत असे, तसेच त्यांना जबरदस्तीने जप म्हणण्यास तो भाग पाडे. शिवाय दिवसाला हजार रुपयांचे अमिष दाखवून त्याने बिहार मधून ही मुले आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. मंत्र जप करताना एखाद्या मुलाचा पाय जमिनीवर टेकल्यास दुबे त्यांच्या पायांवर फटके देत असे. त्यामुळे अनेकांच्या पायांना दुखापत झाली आहे. उपाशी पोटी या मुलांकडून एक ते दोन लाख वेळ जप करायला सांगत असे. याप्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरु असल्याची माहिती समता नगर पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)