Join us

२७ गावांतील कर्मचाऱ्यांच्या वर्कआॅर्डरला स्टे

By admin | Updated: September 10, 2015 00:31 IST

२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासंदर्भातील अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी सोमवारी काढली. त्याची दखल घेऊन आपल्या अनुपस्थितीत दिल्या गेलेल्या त्या ४९९ कर्मचाऱ्यांच्या वर्कआॅर्डरला

डोंबिवली : २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासंदर्भातील अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी सोमवारी काढली. त्याची दखल घेऊन आपल्या अनुपस्थितीत दिल्या गेलेल्या त्या ४९९ कर्मचाऱ्यांच्या वर्कआॅर्डरला केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनीही बुधवारी स्थगिती दिली आहे. जोपर्यंत त्या गावांबाबतचा निश्चित निर्णय होत नाही, तोपर्यंत ही स्थगिती असेल, असेही त्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.या गावांबाबतचा निर्णय होणार असल्याची कुणकुण शिवसेनेला लागली होती. त्यामुळे रवींद्रन परदेशी जाण्याअगोदरच महापौर कल्याणी पाटील यांनी त्या कर्मचाऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी शनिवारी त्यांच्या वर्कआॅर्डरवर आयुक्तांची सही घेऊन रातोरात त्यांचे वाटपही केले. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु, सोमवारीच आलेल्या नव्या अधिसूचनेमुळे त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे. आता पुन्हा नव्याने होणाऱ्या त्या नगरपालिकेत हे कर्मचारी सामावून घेतले जाणार का, त्यास किती अवधी लागेल, यासह अन्य सर्व तांत्रिक निकषांचे काय होणार, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय देतोे, याकडेच कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे. आयुक्तांनी दिलेल्या स्टे आॅर्डरबाबत त्यांनी महापालिकेच्या सर्व विभागांना तातडीने सूचना दिल्याचेही सांगण्यात आले.