Join us
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावे पोटनिवडणूक संघर्ष समितीला युतीचा ठेंगा

By admin | Updated: March 28, 2016 02:27 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घालणाऱ्या भोपर प्रभागात होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजपा या सत्ताधारी पक्षांत युती झाली

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घालणाऱ्या भोपर प्रभागात होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजपा या सत्ताधारी पक्षांत युती झाली असली तरी भोपरमधून भाजपाला उमेदवारी दिल्याने शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या गोटात असलेली नाराजी उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिवसेना-भाजपात गूळपीठ होऊन संघर्ष समितीला बाजूला टाकल्याने समितीचे नेतेही बिथरले आहेत.स्थानिक शिवसैनिकांच्या मते युतीचा निर्णय वरच्या पातळीवर झाला असून शिवसैनिकांना विश्वासात न घेता निर्णय लादलेला आहे. महापालिकेत २७ गावे १ जून २०१५ रोजी समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर, महापालिकेने प्रभागरचना व आरक्षणे जाहीर केली. महापालिका प्रभागांची संख्या १०७ वरून १२२ वर पोहोचली. २७ गावांतील सर्वपक्षीय समितीने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, शिवसेनेने उमेदवारी अर्ज भरले. संघर्ष समितीने भाजपाची पाठराखण करीत समितीचे व भाजपाचे उमेदवार उभे केले. मात्र, भोपर आणि आशेळे-माणरे या दोन गावांत निवडणूक झाली नाही. या दोन्ही प्रभागांत बहिष्कार टाकण्यात आला होता. या प्रभागाची पोटनिवडणूक जाहीर होताच शिवसेना-भाजपाने युती केली. युती करताना संघर्ष समितीलाही वाऱ्यावर सोडले. युतीच्या वाटाघाटींमध्ये भोपर हा प्रभाग भाजपाला तर आशळे-माणेरे हा प्रभाग शिवसेनेला सोडण्यात आला. (प्रतिनिधी)