Join us

गणेशोत्सवानंतर मुंबईत येणाऱ्यांच्या चाचणीसाठी २६६ केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविला आहे. सध्या बाधित रुग्णांच्या संख्येत चढउतार दिसून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविला आहे. सध्या बाधित रुग्णांच्या संख्येत चढउतार दिसून येत आहे. गणेशोत्सवानंतर रुग्ण संख्येत वाढ दिसून येण्याची शक्यता आहे. पुढील १५ दिवस धोक्याचे असल्याने कोविड चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. मुंबईबाहेरून येणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतर कोरोनाचा प्रसार वाढल्याचे आढळून आले होते. गणेशोस्तव काळात बाजारपेठेत खरेदीनिमित्त लोकांची वर्दळ वाढली होती. या काळात भेटीगाठी वाढतात. गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी विशेषतः कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असते. मुंबईत परत येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी होणे आवश्यक आहे. यासाठी पालिकेने मुंबईत २६६ चाचणी केंद्रे सुरू केली आहेत.

मुंबईत सध्या ४ हजार ६५८ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण वाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०६ टक्के आहे. दररोज ४०० ते ४५० बाधित रुग्ण आढळून येत आहेत. तसेच रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही अत्यंत कमी आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला असल्याने महापालिकेने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्याच बरोबर नागरिकांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

.......................................................................

गणेशोत्सवानंतर पुढील १५ दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मुंबई बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी होणे आवश्यक आहे. रेल्वेद्वारे येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करणे शक्य होते. मात्र रस्ता मार्गे मुंबईत येणाऱ्या नागरिकांनी स्वतः येऊन पालिकेच्या २६६ केंद्रांवर विनामूल्य चाचणी करून घ्यावी.

- सुरेश काकाणी (अतिरिक्त महापालिका आयुक्त)