Join us  

२६ अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांचा वनवास संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 2:44 AM

ठाणे व पालघर जिल्ह्यात दहा वर्षांपासून कार्यरत २६ अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांचे नोकरीचे विघ्न दूर झाले आहे.

मुंबई : ठाणे व पालघर जिल्ह्यात दहा वर्षांपासून कार्यरत २६ अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांचे नोकरीचे विघ्न दूर झाले आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांना नोकरीमध्ये पूर्णवेळ कायम करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.डावखरे यांनी सांगितले की, ठाणे व पालघर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये २६ अर्धवेळ प्रयोगशाळा सहायक कार्यरत आहेत. २००८ पासून शाळांमध्ये कार्यरत असतानाही २०१६-१७ च्या संचमान्यतेनुसार अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकाच्या पदाला मंजुरी नव्हती. त्यामुळे त्यांची सेवा नियमित होत नव्हती. तर पदाला मान्यता नसल्यामुळे वेतन अधीक्षक व वेतन भविष्य निर्वाह निधी पथकाकडून बिले मंजूर केली जात नव्हती. त्यामुळे सुमारे १६ महिन्यांपासून २६ कर्मचाऱ्यांना पगारही मिळाला नव्हता. त्यामुळे या कर्मचाºयांबरोबरच कुटुंबीयांचेही वेतनाअभावी हाल होत आहेत. या प्रश्नाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले. तसेच प्रशासकीय पातळीवरही पाठपुरावा सुरू केला होता.ठाणे जिल्ह्यात २७ व पालघर जिल्ह्यात १८ अशी ४५ पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर २६ प्रयोगशाळा सहायकांचे समायोजन होऊ शकते, अशी शिफारस ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी केली होती. तर संबंधित शाळेत प्रयोगशाळा सहायकाची पदे एकाकी आहेत. त्यामुळे त्यावर समायोजन करता येणार असल्याचा अभिप्राय शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी दिला होता. अखेर तावडे यांनी अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांना नोकरीत कायम करण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी दिली.

टॅग्स :विनोद तावडे