Join us  

२५० विमान प्रवाशांचा सात तास खोळंबा, प्रवाशांचे धरणे; पायलट नसल्याने गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 12:25 AM

पायलट उपलब्ध नसल्याने शनिवारी एअर इंडियाचे मुंबई-अहमदाबाद विमान तब्बल सात तास उशिराने चालवण्यात आले. परिणामी, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५० प्रवाशांचा खोळंबा झाला होता.

मुंबई : पायलट उपलब्ध नसल्याने शनिवारी एअर इंडियाचे मुंबई-अहमदाबाद विमान तब्बल सात तास उशिराने चालवण्यात आले. परिणामी, छत्रपती शिवाजी आंतरराष्टÑीय विमानतळावर २५० प्रवाशांचा खोळंबा झाला होता. या काळात संबंधित प्रवाशांना जेवण व इतर सोयी पुरविण्यात आल्या नाहीत. परिणामी, प्रवाशांचा संताप अनावर झाला होता. विमान विलंबाने असल्याची माहिती प्रवाशांना शेवटच्या क्षणी देण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी विमानतळाच्या एक्झिट गेट ४७ जवळ धरणे आंदोलन केले.विमानतळावरील सूत्रांनी सांगितले की, मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी शनिवारी पहाटे १.३५ वाजता एअर इंडियाचे ‘ए आय ०३१’ हे विमान उड्डाण करणार होते. हे विमान एक तास उशिराने उड्डाण करेल, अशा सूचना पहाटे सव्वाएकच्या सुमारास प्रवाशांना देण्यात आल्या. त्यानंतर तासाभरानंतर ‘पायलट नसल्याने विमानाच्या उड्डाणाला उशीर होईल,’ अशा सूचना देण्यात आल्या. त्यामुळे प्रवासी संतापले व प्रवाशांनी विमानतळावर आंदोलन सुरू केले. काही प्रवाशांनी विमानतळावरच धरणे आंदोलन धरले. यामुळे विमानतळावर काही तास गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या काळात प्रवाशांना संपूर्ण रात्र विमानतळावर काढावी लागली. अखेर सकाळी ८.२० वाजता विमानाने उड्डाण केले. दरम्यान, एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन’ (एमडीटीएल)च्या अडचणींमुळे पायलट उपलब्ध नव्हता. त्यामुळे विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला. सकाळी ८.२० नंतर एअर इंडियाची विमान सेवा सुरळीत झाली.

टॅग्स :एअर इंडियामुंबई