ठाणे : अमेरिकन नागरिकांकडून करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केलेल्या नवोज उर्फ कबीर वर्धन गुप्ता (२६) याच्यासह ७० जणांना ठाणे न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. दरम्यान, या फसवणूक प्रकरणी अमेरिकन एफबीआय (फेडरल ब्युरो आॅफ इनव्हेस्टिगेशन) या गुप्तचर संस्थेने ठाणे पोलिसांशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली. मार्च महिन्यात १०० कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. आतापर्यंतच्या तपासात २५० कोटींची फसवणूक झाल्याचा अंदाज असून, ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड भागातील सात कॉल सेंटरमधून केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अमेरिकन आयआरएस (इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिस)चे अधिकारी असल्याची बतावणी करून तब्बल साडेसहा ते सात हजार अमेरिकन नागरिकांची या टोळीने फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असले तरी हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात ४५ तर नयानगर पोलीस ठाण्यात २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धाड टाकलेले कॉल सेंटर पोलिसांनी सील केले असून, पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. यामध्ये अली, राहुल कटाप्पा, तपेश आणि अखिलसिंग अशा २० ते २५ जणांचा शोध घेण्यात येत आहे. ज्या सात हजार परदेशी नागरिकांची फसवणूक झाली त्यांच्यापैकी दोघांनी ठाणे पोलिसांशी संपर्क साधला. आता त्यांच्याकडून इमेलमार्फत तक्रार घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
कॉल सेंटर प्रकरणात २५० कोटींची फसवणूक
By admin | Updated: October 7, 2016 05:43 IST