Join us  

दारुड्याकडून चिमुरडीचे अपहरण, पोलिसांनी फक्त 6 तासांत अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 12:15 PM

घराबाहेर खेळत असताना अडीच वर्षांच्या एका चिमुरडीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी साकीनाका परिसरात घडला.

मुंबई : घराबाहेर खेळत असताना अडीच वर्षांच्या एका चिमुरडीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी साकीनाका परिसरात घडला. मात्र या मुलीची अपहरणकर्त्याच्या तावडीतून 6 तासांत सुखरुप सुटका करुन आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. संदीप शशिकांत परब (वय 28 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी हा टिळकनगर परिसरात त्याच्या आईसोबत राहत होता. 

आरोपीला दारूचं व्यसन असून तो दुकानात कधी कधी बर्फाची डिलिव्हरी करण्याचं काम करायचा. शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास त्याच्याच परिसरात राहणारी शिरीन फातमा घरासमोर खेळत होती. खेळत असताना ती अचानक गायब झाल्यामुळे तिच्या वडिलांनी शोध घेण्यास सुरुवात केली.  पण तिचा पत्ता काही लागेना. अखेर तिच्या पालकांनी याबाबत साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली.  'सहा तास आणि 50 पोलीस'अडीच वर्षांची मुलगी हरवल्याची तक्रार दाखल होताच या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. ज्यात धर्माधिकारी यांच्यासह पोलीस निरीक्षक माने, हुले, मोरे, वडारे, वाघमारे, भाकेकर असे एकूण 50 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या पथकाने दुकानासमोरील सीसीटीव्हींची पाहणी केली.  ज्यात शिरीनला एका तरुण उचलून नेत असताना दिसला. सीसीटीव्हीच्या मदतीनं त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर शिरीनच्या पालकांनी लगेचच परबला ओळखले. कारण त्याला बर्फाची डिलिव्हरी करताना त्यांनी  एकदा पहिले होते. अखेर पोलिसांनी टिळकनगर परिसरातून आरोपीला शोधून काढले. यावेळी संतप्त स्थानिकांनी आरोपीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी लोकांची समजूत काढत त्याला पोलीस ठाण्यात आणले व शिरीनला पालकांच्या स्वाधीन केले. मला लहान मुले आवडतात !'शिरीनला परबने उचलून नेले तेव्हा तो दारूच्या नशेत होता. लहान मुलीला तू का उचलून नेलेस , अशी विचारणा जेव्हा पोलिसांनी केली. तेव्हा मला लहान मुले आवडतात म्हणून मी तिला उचलले, असे उत्तर त्याने दिले. मात्र त्याचा इरादा काही वेगळाच होता, असे पुढील चौकशीत उघड झाले त्यामुळे  परबविरोधात अपहरणासह 'पॉस्को' अंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले. 

टॅग्स :अपहरण