Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेगाब्लॉकदरम्यान २५ विशेष बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 00:46 IST

दर दहा मिनिटाला बस : डोंबिवली-कल्याण, विठ्ठलवाडीसाठी सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नवीन पत्रीपुलासाठी रेल्वेरुळांवर गर्डर उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून २१ व २२ नोव्हेंबरला दोन दिवस सकाळी १०.१५ ते २.१५ या कालावधीत प्रत्येकी चार तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यादरम्यान कल्याण-डोंबिवलीदरम्यान रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत केडीएमटीच्या विशेष २५ बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या गर्दीनुसार दर दहा मिनिटाला या बस सोडल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.

डोंबिवली-ठाणे तसेच कल्याण-कसारा आणि कर्जत अशी रेल्वे वाहतूक मेगाब्लॉकदरम्यान चालू राहणार आहे. परंतु, कल्याण-डोंबिवली रेल्वेमार्ग बंद राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी केडीएमटीकडून २५ बस सोडण्यात येणार आहेत. कल्याण-डोंबिवलीसाठी १० बस, डोंबिवली पूर्व ते विठ्ठलवाडी, कल्याण-बदलापूर आणि कल्याण-टिटवाळा अशा प्रत्येकी पाच बस सोडण्याचे नियोजन २१ व २२ नोव्हेंबरला दोन्ही दिवशी करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेचे आगार व्यवस्थापक संदीप भोसले यांनी दिली.

जुन्या पत्रीपुलाच्या ठिकाणी गर्डरचे काम सुरू राहणार आहे. परंतु, सध्या वापर सुरू असलेल्या पुलावरून सार्वजनिक उपक्रमांच्या बसना प्रवास करण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु, पुलावर वाहनांची गर्दी वाढल्यास कल्याण पश्चिमेतील सुभाष चौक येथील बाईचा पुतळा, श्रीराम टॉकिज, पुणे लिंक रोड ते बाजीप्रभू चौक अशी बस चालविली जाईल.

एसटीही धावणारएसटी महामंडळाच्या बसही धावणार आहेत. डोंबिवली ते ठाणे पुढे मंत्रालय, कल्याण ते मंत्रालय अशा बस चालविणार आहेत. तसेच ठाणे येथूनही कल्याणच्या दिशेने बस चालविण्याचे नियोजन करण्यात आले. 

टॅग्स :लोकल