Join us  

मुंबईत लवकरच आणखी २५ लसीकरण केंद्रे; दिवसाला ९ हजार ५०० लसी देण्याचे उद्दिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 5:22 AM

कोविन ॲपवरून लाभार्थ्यांना रविवारी लसीकरणासाठी संदेश जाईल.

मुंबई : मुंबईत येत्या आठवड्यात लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याचा निर्णय पालिकेने घेतला. सध्या ६५ लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. येत्या आठवड्यात आणखी २५ लसीकरण केंद्र वाढविण्यात येणार असून दिवसाला ९,५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. 

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, पालिकेच्या केईएम, सायन, नायर आणि कूपरमध्ये आता पाचऐवजी दहा लसीकरण केंद्रांची उभारणी करण्यात येईल. तर वांद्रे येथील जम्बो कोविड केंद्रात १५ लसीकरण केंद्र सुरू करण्यात येतील. सर्व केंद्रांवर १००हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल.  अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालय, गोरेगावमधील नेस्को आणि दहिसरमधील जंबो कोविड केअर सेंटर पुढील लसीकरण केंद्रे असू शकतात. 

पालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, कोविन ॲपवरून लाभार्थ्यांना रविवारी लसीकरणासाठी संदेश जाईल. संदेश न गेल्यास पालिकेच्या विभाग कार्यालयातून उपस्थितीसाठी संपर्कही साधण्यात येईल. वाॅक इन व्हॅक्सिन सुरू केल्यापासून लसीकरणासाठी प्रतिसाद वाढत आहे. जे. जे. रुग्णालयातील लसीकरणाविषयी डॉ. ललित संख्ये यांनी सांगितले, लसीबाबत गैरसमज, अफवा दूर करण्यासाठी शासकीय पातळीवर लवकरच जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

टॅग्स :कोरोनाची लस