पालिका प्रशासन : दिवसाला ९ हजार ५०० लस देण्याचे उद्दिष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत येत्या आठवड्यात लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. सध्या शहर, उपनगरात ६५ लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. येत्या आठवड्यात आणखी २५ लसीकरण केंद्र वाढविण्यात येणार असून दिवसाला ९ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे.
याविषयी, पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, पालिकेच्या केईएम, सायन, नायर आणि कूपरमध्ये आता पाचऐवजी दहा लसीकरण केंद्रांची उभारणी करण्यात येईल. तर वांद्रे येथील जम्बो कोविड केंद्रात १५ लसीकरण केंद्र सुरू करण्यात येतील. या सर्व केंद्रांवर १००हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. पालिकेने आता दोन जम्बो कोविड केअर सेंटर आणि एका रुग्णालयाला लसीकरण केंद्र बनवण्यास सुरुवात केली आहे. अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालय, गोरेगावमधील नेस्को आणि दहिसरमधील जंबो कोविड केअर सेंटर ही पुढील लसीकरण केंद्रे असू शकतात. प्रत्येक केंद्रात १५ युनिट्स असतील.
पालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, कोविन ॲपवरून लाभार्थ्यांना रविवारी लसीकरणासाठी संदेश जाईल. मात्र, हा संदेश न गेल्यास पालिकेच्या विभाग कार्यालयातून उपस्थितीसाठी संपर्कही साधण्यात येईल. वाॅक इन व्हॅक्सिन सुरू केल्यापासून लसीकरणासाठी प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांच्या क्षमतेतही वाढ करण्यात येत आहे.
* गैरसमज दूर करण्यासाठी लवकरच जनजागृती
जे. जे. रुग्णालयातील भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीकरणाविषयी डॉ. ललित संख्ये यांनी सांगितले, जे. जे. रुग्णालयातही प्रतिसाद वाढविण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. लसीबाबत गैरसमज, अफवा दूर करण्यासाठी शासकीय पातळीवर लवकरच जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
........................