Join us

पश्चिम उपनगरातील पाच विभागात २५ टक्के रुग्णवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:09 IST

आराेग्य विभाग; बोरीवली, अंधेरी, कांदिवली, मालाड, जोगेश्वरीत सक्रिय रुग्ण अधिकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहर, उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव ...

आराेग्य विभाग; बोरीवली, अंधेरी, कांदिवली, मालाड, जोगेश्वरीत सक्रिय रुग्ण अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शहर, उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मागील आठवड्याभराचा कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेतला असता, पश्चिम उपनगरातील पाच विभागांत सक्रिय रुग्णसंख्येत २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. मागील वर्षी कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळात हेच पाच विभाग कोरोनाचे हाॅटस्पाॅट होते. यात बोरीवली, अंधेरी, कांदिवली, मालाड आणि जोगेश्वरी या विभागांचा समावेश आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, संपूर्ण मुंबईतील सक्रिय रुग्णांच्या संख्येत या विभागांतील रुग्णांचे प्रमाण ३२ टक्के इतके आहे. सध्या मुंबईत ९ हजार ६९० रुग्ण उपचाराधीन आहेत, यातील ३ हजार १२६ या पाच विभागांतील रुग्ण आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढण्यापूर्वी २२ फेब्रुवारी रोजी या विभागातील रुग्णसंख्या २ हजार ३८७ इतकी होती.

याविषयी, पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ९५ टक्के रुग्णांचे निदान या पाच विभागांतील असल्याचे त्यांनी सांगितले. मागील महिन्याभरात सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती दर्शविणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक असल्याचे दिसून येते आहे.

* आरक्षित सभागृहांची तपासणी

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, या विभागातील रुग्णसंख्या वाढीचा अभ्यास करण्यात येत आहे. मात्र निष्कर्षापर्यंत येण्यास काही कालावधी लागेल. रुग्णसंख्या वाढीस केवळ हे विभाग कारणीभूत असल्याचे म्हणता येणार नाही. या विभागातील सार्वजनिक कार्यक्रमांचा आढावा घेण्यात येत असून त्यासाठी आरक्षित सभागृहांचीही तपासणी कऱण्यात येत आहे. याशिवाय, निवासी वसाहतींच्या व्यवस्थापनांना नोटीस बजावून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध कऱणे आणि कोरोनाविषयक नियमावलीचे सक्तीने पालन करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

.........................